Steve Waugh Test Cricket : क्रिकेट हे सुरूवातीला केवळ कसोटी क्रिकेटमुळे ओळखले जात होते. त्यानंतर वन डे क्रिकेट आल्याने कसोटी क्रिकेटकडे काही अंशी दुर्लक्ष झाले. पुढे टी२० क्रिकेटचा वाढता प्रभाव पाहता आता टेस्ट क्रिकेट बंदच होणार का, अशीही चर्चा सुरू झाली होती. पण आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद आणि इतर बड्या क्रिकेट बोर्डांनी कसोटी क्रिकेटला प्रोत्साहन देण्याचे ठरवल्याने पुन्हा एकदा कसोटी क्रिकेटला महत्त्व निर्माण झाले होते. पण नुकतीच एक अशी बाब घडली की, ऑस्ट्रेलियन माजी कर्णधार स्टीव्ह वॉ यावर चांगलाच भडकला. इतकेच नव्हे तर स्टीव्ह वॉ ने ही गोष्ट म्हणजे थेट 'कसोटी क्रिकेटच्या मृत्यूचा क्षण' असल्याचे म्हटले.
नक्की काय घडले?
क्रिकेट दक्षिण आफ्रिका (CSA) ने पुढील महिन्यात न्यूझीलंड विरुद्धच्या दोन सामन्यांच्या मालिकेसाठी आपला द्वितीय श्रेणीचा कसोटी संघ जाहीर केला आहे. त्यात एका नवीन कर्णधारासह सात अनकॅप्ड खेळाडूंचा समावेश आहे. या मुद्द्यावर ऑस्ट्रेलियाचा दिग्गज खेळाडू स्टीव्ह वॉ चांगलाच संतापला. स्टीव्ह वॉ याने क्रिकेट दक्षिण आफ्रिकेची ही कृती लाजिरवाणी असल्याचे म्हटले आहे. अशा प्रकारची बाब घडणे म्हणजे आता आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (ICC) आणि बीसीसीआयसह सर्वोच्च क्रिकेट मंडळांनी या प्रकरणात पुढे येऊन कसोटी क्रिकेट वाचवावे, असे आवाहन केले आहे.
दक्षिण आफ्रिकेने पुढील महिन्यात न्यूझीलंडविरुद्धच्या दोन सामन्यांच्या मालिकेसाठी द्वितीय श्रेणीचा कसोटी संघ जाहीर केला आहे, ज्यामध्ये एका नवीन कर्णधारासह सात अनकॅप्ड खेळाडूंचा समावेश आहे. दक्षिण आफ्रिकेचे अव्वल खेळाडू सध्या घरच्या मैदानावर भारताविरुद्धच्या दोन सामन्यांच्या मालिकेचा भाग आहेत. त्यांच्यापैकी बर्याच जणांना SA20 या फ्रेंचायझी T20 लीगच्या दुसऱ्या सत्रात खेळायचे आहे. ही स्पर्धा आणि न्यूझीलंड दौऱ्याच्या तारखा एकमेकांशी समान असल्याने असा प्रकार घडल्याचेही बोलले जात आहे.