अय्याज मेमनलॉकडाऊनमुळे जगभरातील क्रिकेट घडामोडी थांबलेल्या असताना सध्या चर्चेचा विषय बनला आहे तो, पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तर आणि भारताचे माजी दिग्गज अष्टपैलू कलिपदेव यांच्यात रंगलेल्या वादाचा. क्रिकेटविश्वातील सर्वात नावाजलेल्या वेगवान गोलंदाजांपैकी एक अख्तर आणि भारताचे सर्वात महान अष्टपैलू कपिलदेव यांनी कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर आपापली मते मांडली. मात्र या दोघांच्या मतांमध्ये मोठी तफावत आहे.
आपल्या यूट्यूूब चॅनेलच्या माध्यमातून मत मांडताना अख्तरने सांगितले होते की, कोविड-१९विरुद्ध लढा देण्यासाठी भारत-पाकिस्तानमध्ये तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळविण्यात यावी. यामुळे दोन्ही देशांना आर्थिक फायदाही होईल आणि ही मालिका एक मैत्रीपूर्ण संबंधाची रंगेल. मात्र अख्तरच्या या मतावर कपिलदेव यांनी आपल्या स्टाईलमध्ये उत्तर देताना त्याचा चांगलाच समाचार घेतला. कपिलदेवने अख्तरच्या मतावर तीव्र नाराजी व्यक्त करताना सांगितले की, ‘भारतासाठी आर्थिक समस्या अजिबात नाही.बीसीसीआयने आधीच पीएम केअर्स निधीमध्ये ५१ करोड रुपयांची मदत दिली असून गरज भासल्यास यामध्ये आणखी भरही पडेल.’ क्रिकेट खेळणे अत्यावश्यक नसल्याचे सांगताना कपिलदेवने सांगितले की, ‘पुढील ५-६ महिने क्रिकेटविना जातील असा विचारही करू शकत नाही. पण असे असले, तरी या तीन सामन्यांच्या मालिकेतून किती पैसे गोळा करण्यात यश येईल? आणि सर्वात महत्त्वाचे अशा परिस्थितीमध्ये खेळाडू आणि इतरांच्या जीवांशी का खेळायचे?’ पण यावर गप्प राहील तो अख्तर कसला? त्याने कपिलदेवच्या वक्तव्यावर प्रत्युत्तर देताना म्हटले की, ‘बहुतेक कपिल यांच्याकडे खूप पैसे असतील, पण इतरांकडे नाही. भारत-पाक मालिका संपूर्ण जगाचे लक्ष वेधून घेईल आणि त्यातून मोठी रक्कम जमा होण्यास मदत मिळेल. यामुळे दोन्ही देशांना कोविड-१९विरुद्ध लढण्यास सोपेही जाईल.’
मुळात मदतनिधी उभारण्यासाठी आयोजित केलेला सामना क्रीडाविश्वासाठी आणि त्यातही क्रिकेटसाठी काही नवखा नाही. अगदी काही दिवसांआधीच आॅस्टेÑलियातील बुशफायर संकटाचा सामना करण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या विशेष सामन्यात भारताकडून सचिन तेंडुलकर, युवराज सिंग आणि पाकिस्तानकडून वसिम अक्रम, तसेच इतर देशांच्याही माजी क्रिकेटपटूंनी सहभाग घेतला होता. पण सध्याच्या दिवसांमध्ये भारत-पाक सामना आणि तोही मदतनिधी सामना खेळविणे खूप मोठे आव्हान आहे. राजकीय आणि भावनिकदृष्ट्याही या सामन्याचे वेगळे स्थान आहे. दुसरीकडे, शाहिद आफ्रिदीच्या मदतनिधीमध्ये मोठ्या प्रमाणात सहकार्य करा, असे आवाहन काही दिवसांपूर्वी हरभजन सिंग आणि युवराज सिंग यांनी केले होते. यावर त्यांना भारतीय चाहत्यांनी सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात ट्रोल करण्यात आले होते. आयसीसी स्पर्धांचा अपवाद वगळता २०१३ सालापासून या दोन्ही देशांमधील क्रिकेट सामने थांबले आहेत.