Join us  

टीम इंडियाचा विजयाचा निर्धार, आज सहावी एकदिवसीय लढत, मालिका ५-१ ने जिंकण्याची संधी

ऐतिहासिक एकदिवसीय मालिका विजयानंतर शुक्रवारी द. आफ्रिकेविरुद्ध होणारा सहावा एकदिवसीय सामना जिंकण्याचा निर्धार विराट सेनेने व्यक्त केला आहे. या सामन्यात राखीव खेळाडूंना संधी मिळण्याची दाट शक्यता आहे. दुसरीकडे यजमानांची प्रतिष्ठा देखील पणाला लागली आहे.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2018 6:03 AM

Open in App

सेंच्युरियन : ऐतिहासिक एकदिवसीय मालिका विजयानंतर शुक्रवारी द. आफ्रिकेविरुद्ध होणारा सहावा एकदिवसीय सामना जिंकण्याचा निर्धार विराट सेनेने व्यक्त केला आहे. या सामन्यात राखीव खेळाडूंना संधी मिळण्याची दाट शक्यता आहे. दुसरीकडे यजमानांची प्रतिष्ठा देखील पणाला लागली आहे.भारताने मालिका ४-१ ने याआधीच जिंकली. जोहान्सबर्गच्या चौथ्या एकदिवसीय सामन्यात पावसाच्या व्यत्ययात भारताला पराभव पत्करावा लागला होता. मागच्या सामन्यातील विजयासह भारताने द. आफ्रिकेकडून एकदिवसीय क्रमवारीतील अव्वल स्थानदेखील हिसकावून घेतले. या सामन्यानंतर टी-२० मालिकेला सुरुवात होणार असल्याने कोहली संघात फारसे बदल करेल, असे वाटत नाही. भुवनेश्वर कुमार सलग १९ एकदिवसीय, दोन कसोटी आणि सहा टी-२० सामने खेळला असून बुमराहने २० एकदिवसीय आणि ८ टी-२० सामने खेळले आहेत. या दोघांना विश्रांतीची गरज आहे. या निमित्ताने भारताला पर्यायी गोलंदाजांची चाचणी घेता येईल. २०१९ चा विश्वचषक लक्षात घेता संघ व्यवस्थापन नव्या खेळाडूंची चाचपणी करण्याच्या विचारात आहे. शमी २०१५ च्या विश्वचषकानंतर तीन एकदिवसीय सामने खेळला. दुखापतीतून सावरल्यानंतर त्याने वेस्ट इंडिजविरुद्ध मागच्यावर्षी दोन आणि आॅस्ट्रेलियाविरुद्ध एक सामना खेळला. शार्दुल ठाकूर दोनच एकदिवसीय सामने खेळला. याशिवाय मधल्या फळीकडे लक्ष देण्याची गरज आहे. चौथ्या ते सातव्या स्थानावरील फलंदाजांकडून धावांचा पाऊस पडताना दिसत नाही. आघाडीच्या फळीने धावा काढल्यानंतर मधली फळी सातत्य राखण्यात अपयशी ठरत आहे. मनीष पांडे आणि दिनेश कार्तिक हे संघात आहेत पण त्यांना अद्याप संधीच मिळाली नाही. दरम्यान भारताने आज सराव केला नाही. द. आफ्रिकेसमोर पुन्हा एकदा फिरकी गोलंदाजांचे मुख आव्हान असेल. त्यांना फिरकी गोलंदाजांविरुद्ध अडखळत खेळावे लागले. तसेच एबी डिव्हिलियर्स, हाशिम आमला, जेपी ड्युमिनी, डेव्हिड मिल्लर अशा प्रमुख फलंदाजांकडून मोठ्या खेळीचीही यजमानांना अपेक्षा आहे. (वृत्तसंस्था)उभय संघ यातून निवडणारभारत : विराट कोहली (कर्णधार), शिखर धवन, रोहित शर्मा, अंजिक्य रहाणे, श्रेयस अय्यर, मनीष पांडे, दिनेश कार्तिक, केदार जाधव, महेंद्रसिंग धोनी, हार्दिक पांड्या,युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, अक्षर पटेल, भुवनेश्वर कुमार, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी आणि शार्दुल ठाकूर.दक्षिण आफ्रिका : एडेन मार्करम(कर्णधार) , हाशिम अमला, जेपी ड्यूमिनी, इम्रान ताहिर, डेव्हिड मिलर, मोर्नी मोर्केल, ख्रिस मॉरिस, लुंगी एंगिडी, अँंडिले पी, कागिसो रबाडा, तबरेज शम्सी, के. झोंडो, फरहान बेहार्डियेन,हेन्रिच क्लासेन, एबी डिव्हिलियर्स.

टॅग्स :क्रिकेटभारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका २०१८