- अयाझ मेमन संपादकीय सल्लागार
महिला टी२० विश्व अजिंक्यपद स्पर्धेच्या उपांत्य फेरीत झालेला भारताचा पराभव अत्यंत निराशाजनक ठरला. ज्याप्रकारे भारताने साखळी फेरीत सलग चार सामने जिंकून आगेकूच केली होती, त्यानंतर अपेक्षा वाढल्या होत्या. या कामगिरीच्या जोरावर त्यांच्याकडून जेतेपदाची अपेक्षा होती. कमीत कमी अंतिम फेरीत तरी हा संघ पोहचेल असा विश्वास वाटत होता. पण दुर्दैवाने तसे झाले नाही.
या परभावाचे अनेक कारणे आहे. एक म्हणजे इंग्लंड संघ अप्रतिम खेळला. त्याशिवाय भारतीय महिला खूप दबावाखाली दिसत होत्या. त्यामुळे त्यांचा खेळण्याचा अंदाजही खूप आक्रमक होता. टी२० क्रिकेटमध्ये अशी आक्रमकता असावीच लागते, पण त्याचबरोबर थोडा संयमही असायलाच पाहिजे. यानंतर जसे फलंदाज बाद व्हायला लागले, तशी भारताची फलंदाजी अक्षरश: कोसळली. दुसरे कारण म्हणजे सर्वात अनुभवी खेळाडू मिताली राजला संघाबाहेर बसविण्याचा घेण्यात आलेला धक्कादायक निर्णय. याआधीचे सर्व सामने साखळी सामने होते, पण हा बाद फेरीचा सामना होता आणि इथे हरल्यानंतर दुसरी संधी नव्हती. त्यामुळेच अशा निर्णायक सामन्यामध्ये अनुभव खूप महत्त्वाचा ठरतो. शिवाय मितालीशिवाय आणखी कोणाकडे मोठा अनुभव नव्हता.
मितालीविषयी हरमनप्रीत आणि संघ व्यवस्थापनाने मिळून निर्णय घेतला असणार. पण असे अनेक उदाहरण पुरुष क्रिकेटमध्येही पाहण्यास मिळाले आहेत. अगदी २०११ सालच्या विश्वचषक स्पर्धेत सर्वाधिक धावा काढणारा फलंदाज होता ३८ वर्षांचा सचिन तेंडुलकर. त्यामुळे खेळताना वयाकडे अधिक लक्ष दिले गेले नाही पाहिजे. त्यामुळे जर खेळवायचेच नव्हते, तर मितालीला संघातच स्थान मिळाले नव्हते पाहिजे. जर संघात स्थान दिलेच होते, तर तिला नक्कीच मोठ्या सामन्यात खेळवायला पाहिजे होते.
आता पराभव झाला असल्याने या निर्णयावर क्रिकेटचाहत्यांची मोठी टीकाही होणार आणि ती झालीही आहे. मला वाटते की, संघात मितालीची आवश्यकता नसण्याचा जो विचार होता, तिथेच भारतीय संघाची चूक झाली. पण एकूणच गेल्या काही महिन्यांतील खेळ पाहता भारतीय महिला क्रिकेटचे भविष्य उज्ज्वल आहे.
संघात बदल होण्याची शक्यता कमी
पुरुष क्रिकेटविषयी म्हणायचे झाल्यास पुन्हा पावसाने भारताची विकेट काढली असेच म्हणावे लागेल. भारत - आॅस्टेÑलिया सामन्यात पावसाची शक्यता होती. पण जेव्हा भारताने यजमानांना मर्यादेत रोखले, तेव्हा विजयाची संधी दिसत होती. आता आॅस्टेÑलिया ही मालिका गमावू शकत नाही.
या सामन्यात भारताने संघबदल केला नाही, जो चांगला निर्णय होता. कारण लोकेश राहुलला फॉर्ममध्ये येण्यासाठी खेळविणे गरजेचे होते. कृणाल पांड्या, खलील अहमद दोघेही युवा असल्याने त्यांनाही संधी मिळाली. पण अशा खेळाडूंवर विश्वास ठेवणे खूप महत्त्वाचे ठरते. त्यामुळे अखेरच्या टी२० सामन्यासाठी संघात बदल होण्याची शक्यता खूप कमी आहे.
Web Title: The decision to not play Mithali Raj was missed
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.