नवी दिल्ली : आॅस्ट्रेलियात आॅक्टोबरमध्ये आयोजित टी-२० विश्वचषक आयोजनाचा निर्णय आज बुधवारी दुबईत होणाऱ्या आंतरराष्टÑीय क्रिकेट परिषदेच्या बैठकीत होण्याची शक्यता आहे. याच बैठकीत आयसीसीच्या पुढील अध्यक्षपदासाठी नामांकन प्रक्रियेची घोषणा केली जाईल. दुसरीकडे बीसीसीआय क्रिकेट आॅस्ट्रेलियाच्या आग्रहाखातर २०२१ ऐवजी २०२२ ला विश्वचषकाच्या आयोजनावर सहमत होईल का, हे पाहणे महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
यासंदर्भात बीसीसीआय कोषाध्यक्ष अरुण धुमल म्हणाले, ‘आयसीसी यंदाच्या विश्वचषकावर काय निर्णय घेईल, हे पाहावे लागेल.’ पूर्व निर्धारित वेळापत्रकानुसार भारताला २०२१ चे तर आॅस्ट्रेलियाला २०२२ चे यजमानपद मिळाले आहे. या आयोजनाची अदलाबदल भारत-आॅस्ट्रेलिया मालिकेसाठी करावीच लागेल, असे मत वरिष्ठ अधिकाºयाने व्यक्त केले. दुसरीकडे प्रसारक स्टार इंडियाने आयपीएलसह आयसीसी स्पर्धेचे हक्क विकत घेतले आहेत. त्यांचे मत लक्षात घेतले जाईल. विश्वचषक रद्द झाल्यास आॅक्टोबर-नोव्हेंबरमध्ये आयपीएलचे १३ वे सत्र आयोजित केले जाईल, ही देखील शक्यता वर्तविली जात आहे. आयसीसीचे मावळते चेअरमन शशांक मनोहर यांचा उत्तराधिकारी निवडण्यासाठी मानांकनाची औपचारिक घोषणा केली जाईल. या पदासाठी आधी ईसीबीचे कोलिन ग्रेव्ह हे एकमेव दावेदार होते. तथापि बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली आणि पीसीबीकडून एहसान मनी यांची नावे पुढे आली. बीसीसीआयने गांगुली यांना औपचारिक उमेदवार घोषित केले नाही. यावर धुमल म्हणाले,‘ आम्ही घाई करणार नाही. निवडणूक प्रक्रिया सुरू होऊ द्या. योग्यवेळी निर्णय घेऊ.’दुबई : आयसीसीने कसोटी सामन्यादरम्यान कोरोनाबाधित खेळाडू बदलण्याची परवानगी बहाल केली आहे. याशिवाय चेंडूला चकाकी आणण्यासाठी लाळेच्या वापरावरही मंगळवारी तात्पुरत्या बंदीस मंजुरी दिली. कोरोनामुळे प्रवासबंदी असल्याने द्विपक्षीय मालिकेसाठी स्थानिक पंचांनादेखील मंजुरी देण्यात आली. कोरोनाबाधित खेळाडूऐवजी बदली खेळाडूचा निर्णय सामनाधिकारी घेतील. वन डे आणि टी-२० मध्ये मात्र हा नियम लागू असणार नाही.