इंडियन प्रीमिअर लीग २०२४ ( IPL 2024) च्या लिलावाची जोरदार तयारी सुरू झाली आहे. १० फ्रँचायझीने त्यांची रिटेन लिस्ट जाहीर केली आहे आणि आता १९ डिसेंबरला होणाऱ्या लिलावाची सर्वांना उत्सुकता आहे. त्यासाठी ११६६ खेळाडूंनी नावं नोंदवली आहेत, त्यापैकी ८३० खेळाडू भारतीय आहेत. मुंबई इंडियन्सने आपला जुना सहकारी व गुजरात टायटन्सचा कर्णधार हार्दिक पांड्या याला पुन्हा आपल्या ताफ्यात घेऊन सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला. असेच काही धक्के आगामी पर्वात पाहायला मिळण्याची शक्यता आहे. महेंद्रसिंग धोनी ( MS Dhoni) आयपीएल २०२४ मध्ये खेळणार असल्याने चाहते आनंदात आहेत, परंतु त्याच्या नंतर CSKचा कर्णधार कोण? हा प्रश्न अजुनही अनुत्तरीत आहे.
आयपीएल २०२४ हा धोनीचा शेवटचा हंगाम असेल, त्यानंतर तो निवृत्त होईल, अशी पुन्हा चर्चा आहे. अशा परिस्थितीत जेव्हा CSK त्याच्या जागी कोणाला घेतंय, याकडे सर्वांची नजर असेल. भारताचा माजी क्रिकेटपटूने आयपीएल २०२५साठी दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार रिषभ पंत ( Rishabh Pant) हा चेन्नई सुपर किंग्सच्या ताफ्यात खेळताना दिसू शकतो, असा दावा केला आहे. चेन्नई सुपर किंग्ज दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार आणि स्टार भारतीय यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंतसाठी तिजोरी रिकामी करू शकतो, असेही या खेळाडूने म्हटले आहे.
भारताचा माजी खेळाडू दीप दास गुप्ता याला वाटते की, CSK २०२५ मध्ये रिषभचा समावेश करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करू शकते. त्याने ट्विटरवरील एका व्हिडिओमध्ये म्हटले आहे की, 'आयपीएल २०२५ पर्यंत त्यांनी रिषभ पंतला संघात घेतले तर तर आश्चर्य वाटायला नको. धोनी आणि रिषभ यांच्यात खूप सामन्य आहे. रिषभ धोनीला आदर्श मानतो. त्यांनी खूप वेळ एकत्र घालवला आहे. त्यांचे नाते आणि रिषभची मानसिकता धोनीसारखीच आहे, कारण तो खूप आक्रमक आणि सकारात्मक आहे. तो नेहमी जिंकण्याबद्दल बोलतो.'