नवी दिल्ली : क्रीडा विश्वातील सर्वोच्च पुरस्कार ‘खेलरत्न’साठी यंदा दुर्लक्ष करण्यात आल्याची भावना पॅरालिम्पिक रौप्यपदक विजेती दीपा मलिक हिने व्यक्त केली आहे. आपल्या नावाचा फेरविचार करण्याची मागणी तिने स्वत: तसेच हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांनी केली असली तरी केंद्र सरकार ही मागणी पूर्ण करेल, असे दिसत नाही.निवड पॅनलने या पुरस्कारासाठी २०१६ च्या रिओ पॅरालिम्पिक सुवर्ण विजेता भालाफेकपटू देवेंद्र झझारिया आणि हॉकीचा माजी कर्णधार सरदारसिंग यांच्या नावाची आधीच शिफारस केली. खट्टर यांनी १६ आॅगस्ट रोजी लिहिलेल्या पत्रात दीपा मलिक हिला या प्रतिष्ठेच्या पुरस्काराने गौरविण्याची मागणी केली. दीपाच्या नावाचा फेरविचार करण्याची विनंती त्यांनी केंद्र सरकारकडे केली. मलिक ही पॅरालिम्पिक पदक जिंकणारी पहिलीच भारतीय महिला खेळाडू आहे. दीपाने ७ आॅगस्ट रोजी क्रीडामंत्री विजय गोयल यांना पाठविलेल्या ई-मेलमध्ये फेरविचार करण्याची मागणी करीत भेटीसाठी वेळ देखील मागितला.वृत्तसंस्थेशी बोलताना दीपा म्हणाली,‘ पुरस्कारासाठी माझ्याकडे दुर्लक्ष झाले आहे. कुठे काय उणीव राहिली हे कळायला मार्ग नाही.’ वयाच्या ५० व्या वर्षी २०२० मध्ये आणखी एक पदक जिंकावे लागेल तरच पुरस्कार मिळेल का, असा सवाल दीपाने उपस्थित केला.पुरस्कारासाठी लॉबिंग होत असल्याचा दीपाने इन्कार केला. ‘खेलरत्न आॅलिम्पिक वर्षांत एकापेक्षा अनेक खेळाडूंना देता येतात. मी फेरविचार करण्याची मागणी करीत आहे, लॉबिंग नव्हे. समितीच्या बैठकीपूर्वी लोकांना प्रभावित करण्याचा प्रयत्न झाला तर त्याला लॉबिंग म्हणता येईल. माझे नाव पुरस्कार यादीत नव्हते म्हणून मी मंत्रालयाला ई-मेल लिहिला. हे केवळ आवाहन आहे. मला राज्याच्या मुख्यमंत्र्यांचा पाठिंबा लाभला. माझ्या नावाकडे दुर्लक्ष झाल्याची त्यांची देखील भावना आहे.’
- Cricket Buzz»
- बातम्या»
- दीपा मलिकचे ‘खेलरत्न’साठी सरकारकडे साकडे
दीपा मलिकचे ‘खेलरत्न’साठी सरकारकडे साकडे
क्रीडा विश्वातील सर्वोच्च पुरस्कार ‘खेलरत्न’साठी यंदा दुर्लक्ष करण्यात आल्याची भावना पॅरालिम्पिक रौप्यपदक विजेती दीपा मलिक हिने व्यक्त केली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2017 12:51 AM