इंडियन प्रीमिअर लीग २०२४ आता अंतिम टप्प्याकडे वळत आहे.. राजस्थान रॉयल्स, कोलकाता नाईट रायडर्स यांनी प्ले ऑफच्या उंबरठ्यापर्यंत मजल मारली आहे, तर सनरायझर्स हैदराबाद, लखनौ सुपर जायंट्स आणि चेन्नई सुपर किंग्स हे शर्यतीत आहेत. मुंबई इंडियन्सचे पॅक अप झाले असून रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू, दिल्ली कॅपिटल्स, पंजाब किंग्स व गुजरात टायटन्स हेही त्याच मार्गावर आहेत. अशात चेन्नई सुपर किंग्स व लखनौ सुपर जायंट्स यांची डोकेदुखी वाढवणारी बातमी समोर येत आहेत. दीपक चहर ( Deepak Chahar) आणि मयांक यादव ( Mayank Yadav) यांनी आयपीएल २०२४ मधील त्यांचा शेवटचा सामना कदाचित खेळून झाला आहे. या दोघांनाही दुखापतीने ग्रासले आहे आणि पुढे ते कदाचित खेळू शकतील, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.
''दीपकची दुखापत चांगली दिसत नाहीए... मी हे म्हणत नाही की तो स्पर्धेतून बाहेर गेला आहे, परंतु त्याच्या खेळण्यावर साशंकता आहे,''असे CSK चे सीईओ कासी विश्वनाथन यांनी सांगितले. मागील सामन्यात हॅमस्ट्रींगमुळे दीपकने माघार घेतली होती. पंजाब किंग्सविरुद्धच्या चेपॉकवर झालेल्या सामन्यात पहिल्या षटकात दोन चेंडू टाकून तो पॅव्हेलियनमध्ये परतला होता. CSK ला पुढील सामन्यात धर्मशाला येथे PBKS चा सामना करायचा आहे आणि १४ कोटींचा चहर या सामन्यासाठी हिमाचल प्रदेश येथे संघासोबत दाखल झालेला नाही. तो चेन्नईतच थांबला आहे आणि त्याच्या वैद्यकीय अहवालाची प्रतीक्षा करतोय, असेही विश्वनाथन यांनी सांगितले.
चेन्नईचे मुख्य प्रशिक्षक स्टीफन फ्लेमिंग यांनीही सांगितले की, दीपक चहरची दुखापत चांगली दिसत नाही. प्राथमिक पाहता ती चांगली दिसत नाही. त्यामुळे त्याच्या सकारात्मक अहवालाची आम्हाला प्रतीक्षा आहे.
CSK ला तुषार देशपांडेच्याही आजारपणाची चिंत आहे. त्याला ताप आला आहे आणि तो धर्मशाला येथे संघासोबत आला आहे. मथिशा पथिराणा यालाही मागील सामन्यात मुकावे लागले होते. दुसरीकडे लखनौ सुपर जायंट्सचा गोलंदाज मयांक अग्रवाल यानेही मागील सामन्यात ३.१ षटकं टाकून माघार घेतली. त्याचेही पुढे खेळणे अवघड दिसत आहे. CSK १० सामन्यांत ५ विजय व ५ पराभव मिळवून १० गुणांसह सध्या पाचव्या क्रमांकावर आहे, तर LSG १० सामन्यांत ६ विजय मिळवून १२ गुणांसह तिसऱ्या क्रमांकावर आहे.