India vs South Africa 3rd ODI: भारताचा अष्टपैलू खेळाडू दीपक चहर याने संघाला विजयाच्या समीप नेले पण अखेर भारताला सामन्यात पराभवच स्वीकारावा लागला. दीपक चहरने झुंजार खेळी करताना ५४ धावा केल्या. या खेळीत त्याने ५ चौकार आणि २ षटकार खेचले. पण मोक्याच्या क्षणी तो बाद झाला. त्यानंतर जसप्रीत बुमराह आणि युजवेंद्र चहल या दोघांनी आपल्या विकेट्स बहाल केल्यामुळे भारताला ४ धावांनी पराभव स्वीकारावा लागला. सामन्यानंतर मालिका पराभवाबाबात राहुलने आपलं मत व्यक्त केलं. त्यावेळी त्याने दीपक चहरबद्दलही भावना व्यक्त केल्या.
दीपक चहरच्या खेळीमुळे आम्हाला सामना जिंकण्याची संधी मिळाली होती पण आम्हाला विजय मिळवता आला नाही. सामना खूपच अटीतटीचा झाला. सामना हारल्याचं नक्कीच आम्हा साऱ्यांना दु:ख आहे. सामना पाहणाऱ्यांना सगळ्यांनाच आम्ही कुठे चुकलो ते माहिती आहे. फलंदाज म्हणून आम्ही काही बेजबाबदार फटके खेळले आणि त्यामुळे आम्ही संधी गमावली. आमच्या गोलंदाजांनीही चुकीच्या टप्प्यावर गोलंदाजी केली. त्यामुळे प्रतिस्पर्धी संघाच्या फलंदाजांवर अजिबातच दबाव निर्माण झाला नाही आणि म्हणूनच आम्ही मालिका हारलो", अशा भावना राहुलने व्यक्त केल्या.
"या मालिकेतून आम्ही खूप काही शिकलो. या अनुभवातून आम्ही सर्वच खेळाडू धडा घेऊ आणि एक चांगला संघ म्हणून नव्याने उभारी घेऊ", असंही राहुलने स्पष्ट केलं.
दरम्यान, सामन्यात आफ्रिकेच्या डावाची सुरूवात खराब झाली. नव्याने संधी मिळालेल्या दीपक चहरने झटपट दोन बळी टिपले. पण नंतर क्विंटन डी कॉक आणि रॅसी वॅन डर डुसेन यांनी १४४ धावांची भागीदारी केली. डी कॉकने १२४ तर डुसेनने ५२ धावा केल्या. २८८ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना विराट कोहली आणि शिखर धवन या दोघांनी भारताचा डाव सावरत ९८ धावांची भागीदारी केली. शिखर धवन (६१) आणि विराट कोहली (६५) अर्धशतक करून बाद झाले. भारत सामना हारणार असं वाटत असतानाच दीपक चहरने तळाच्या फलंदाजांना हाताशी घेऊन झुंजार अर्धशतक ठोकले. पण त्याची झुंज अखेरीस अपयशी ठरली.