नवी दिल्ली : भारतीय संघ (Indian Cricket Team) सध्या झिम्बाब्वे दौऱ्यावर आहे. भारतीय संघाने तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत २-० ने विजयी आघाडी घेतली आहे. या मालिकेत यजमान संघाला एकही विजय मिळवता आला नाही. या मालिकेमधूनच दीपक चाहरचे (Deepak Chahar) भारतीय संघात पुनरागमन झाले आहे. चाहरचा झिम्बाव्बेमध्ये (Zimbabwe) देखील मोठा चाहता वर्ग आहे. आयपीएल २०२२ अन् त्यानंतर झालेल्या आंतरराष्ट्रीय मालिकांना मुकलेल्या दीपक चाहरने झिम्बाब्वेविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यातून पुनरागमन केले होते. जवळपास ६ महिन्यांनी पहिला आंतरराष्ट्रीय सामना खेळणाऱ्या दीपकने मालिकेतील पहिल्या सामन्यात ३ बळी पटकावून सामनावीर हा पुरस्कार पटकावला होता.
दीपक चाहरने चाहत्यांना केले खुश दरम्यान, झिम्बाब्वे मधील काही महिला चाहत्या चाहरसोबत फोटो काढण्यासाठी खूप उत्सुक होत्या. आपल्या चाहत्यांना नाराज न करता चाहरने देखील त्यांची हौस पूर्ण केली आणि सर्वांसोबत फोटो काढले. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल होत असून चाहते दीपकच्या साध्या स्वभावाचे खूप कौतुक करत आहेत. व्हिडीओमध्ये काही विदेशी महिला चाहत्यांनी चाहरला फोटो काढण्याची विनंती केली आहे. चाहत्यांनाही यावेळी चाहरची नम्रता आवडली कारण चाहते त्याच्या खांद्यावर हात ठेवून फोटो काढत होते. दोन्ही महिलांनी त्यांच्या खांद्यावर हात ठेवण्याची परवानगी मागितली होती आणि चाहरने हसत हसत ते मान्य केले. महिला चाहत्या फोटो घेतल्यानंतर खूप खुश झाल्या.
दुसऱ्या सामन्यातून चाहरला वगळलेपहिल्या एकदिवसीय सामन्यात दीपक चाहर, अक्षर पटेल व प्रसिद्ध कृष्णा यांनी प्रत्येकी ३ बळी घेताना झिम्बाब्वेचा संघ १८९ धावांत गुंडाळला. प्रत्युत्तरात शिखर धवन व शुबमन गिल यांनी १९२ धावा करून संघाला १० गडी राखून विजय मिळवून दिला. दुसऱ्या सामन्यातही भारतीय संघाने विजय मिळवून मालिकेवर कब्जा केला आहे. १६२ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारताने सहज विजय मिळवला. मात्र पहिल्या सामन्यात उल्लेखणीय कामगिरी करून देखील चाहरला दुसऱ्या सामन्यात वगळण्यात आले. मांडीचे स्नायू दुखावल्यामुळे आणि पाठीच्या दुखण्यामुळे तो ६ महिने क्रिकेटपासून दूर होता. ३० वर्षीय गोलंदाजाने पहिल्या एकदिवसीय सामन्यात ७ षटकांत २७ धावा देताना तीन बळी घेतल होते. पण दुसऱ्या सामन्यात तो खेळत नसल्याने पुन्हा एकदा त्याच्या फिटनेसबाबत शंका उपस्थित होताना दिसत आहे.
भारताची विजयी आघाडी उत्तम गोलंदाजी अन् फलंदाजांच्या योगदानाच्या जोरावर भारतीय संघाने शनिवारी दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात देखील विजय मिळवला. सलग २ सामन्यात मोठा विजय मिळवून भारताने २-० ने मालिकेवर कब्जा केला आहे. शार्दुल ठाकूरने मिळालेल्या संधीचे सोने करताना दुसऱ्या सामन्यात ३ बळी पटकावून यजमान संघाची कंबर मोडली. आशिया चषक स्पर्धेसाठी भारताचा सलामीवीर फलंदाज असलेल्या के.एल राहुलने दुसऱ्या सामन्यात केवळ १ धाव केली आणि बाद झाला.