भारत विरुद्ध बांगलादेश यांच्यातील तिसऱ्या व अंतिम ट्वेंटी-20 सामन्यांत दीपक चहरनं हॅटट्रिक घेत विक्रम घडवला होता. आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-20त हॅटट्रिक नोंदवणारा तो दुसरा भारतीय आणि पहिला पुरुष खेळाडू ठरला. यापूर्वी 2012मध्ये भारताच्या एकता बिश्तनं श्रीलंकेविरुद्ध ट्वेंटी-20त हॅटट्रिक नोंदवली होती. या कामगिरीनंतर चहरनं पुन्हा एक हॅटट्रिक नोंदवली, असा दावा भारतीय क्रिकेट नियामक मंडळानं ( बीसीसीआय) केला होता. पण, त्यांचा खोटारडेपणा पुन्हा उघड झाला असून चहरची हॅटट्रिक अवैध ठरली आहे.
लोकेश राहुल व श्रेयस अय्यर यांनी अर्धशतकी खेळी करताना संघाला मोठी धावसंख्या उभारून दिली. या दोघांनी वैयक्तिक अर्धशतकासह संघाला 5 बाद 174 धावांपर्यंत मजल मारून दिली. प्रत्युत्तरात बांगलादेशकडूनही दमदार खेळ झाला. मोहम्मद मिथून व मोहम्मद नइम यांनी भारतीय गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेतला. पण, दीपक चहर (6/7) आणि शिवम दुबे ( 3/30) यांनी संघाला कमबॅक करून दिलं. भारतानं हा सामना 30 धावांनी जिंकला. रविवारी झालेल्या या सामन्यानंतर दीपक चहरनं मंगळवारी आणखी एका हॅटट्रिकची नोंद केली.
मंगळवारी सय्यद मुश्ताक अली ट्वेंटी-20 स्पर्धेत राजस्थान संघाचे प्रतिनिधित्व करताना चहरनं हॅटट्रिक घेतल्याचा दावा बीसीसीआयनं केला. त्यानं विदर्भ संघाविरुद्ध 18 धावांत 4 विकेट्स घेतल्या आणि त्यात हॅटट्रिकचा समावेश असल्याचं सांगण्यात आलं.त्याच्या या कामगिरीच्या जोरावर राजस्थाननं प्रतिस्पर्धी विदर्भला 13 षटकांत 9 बाद 99 धावांत रोखलं. पण, त्यानं दोन विकेट्सच्या मध्ये एक वाईड बॉल टाकला होता आणि याची शहानिशा न करता बीसीसीआयनं चहरनं हॅटट्रिक घेतली असे ट्विट केले होते.