भारताच्या ट्वेंटी-20 संघातील हुकुमी एक्का दीपक चहरनं पुन्हा एकदा आपल्या भेदक गोलंदाजीनं प्रतिस्पर्धींना हैराण केले. बांगलादेशविरुद्धच्या तिसऱ्या व अंतिम ट्वेंटी-20 सामन्यात हॅटट्रिक नोंदवून इतिहास घडवणाऱ्या चहरनं सय्यद मुश्ताक अली चषक स्पर्धेतही सातत्यपूर्ण कामगिरी कायम राखली आहे. त्याची प्रचीती गुरुवारीही आली. उत्तर प्रदेश आणि राजस्थान यांच्यातील या सामन्यात चहरनं पुन्हा एकदा एका षटकात तीन विकेट्स घेतल्या. राजस्थान संघाचे प्रतिनिधित्व करताना चहरनं उत्तर प्रदेशच्या तीन फलंदाजांना एकाच षटकात माघारी पाठवले. पण, त्याला हॅटट्रिक नोंदवण्यात अपयश आले.
भारत विरुद्ध बांगलादेश ट्वेंटी-20 सामन्यात दीपकनं हॅटट्रिक घेत विक्रम घडवला होता. आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-20त हॅटट्रिक नोंदवणारा तो दुसरा भारतीय आणि पहिला पुरुष खेळाडू ठरला. यापूर्वी 2012मध्ये भारताच्या एकता बिश्तनं श्रीलंकेविरुद्ध ट्वेंटी-20त हॅटट्रिक नोंदवली होती. या कामगिरीनंतर चहरनं पुन्हा एक हॅटट्रिक नोंदवली, असा दावा भारतीय क्रिकेट नियामक मंडळानं ( बीसीसीआय) केला होता. पण, त्यांचा खोटारडेपणा पुन्हा उघड झाला असून चहरची हॅटट्रिक अवैध ठरली आहे.
मंगळवारी सय्यद मुश्ताक अली ट्वेंटी-20 स्पर्धेत राजस्थान संघाचे प्रतिनिधित्व करताना चहरनं हॅटट्रिक घेतल्याचा दावा बीसीसीआयनं केला. त्यानं विदर्भ संघाविरुद्ध 18 धावांत 4 विकेट्स घेतल्या आणि त्यात हॅटट्रिकचा समावेश असल्याचं सांगण्यात आलं.त्याच्या या कामगिरीच्या जोरावर राजस्थाननं प्रतिस्पर्धी विदर्भला 13 षटकांत 9 बाद 99 धावांत रोखलं. पण, त्यानं दोन विकेट्सच्या मध्ये एक वाईड बॉल टाकला होता आणि याची शहानिशा न करता बीसीसीआयनं चहरनं हॅटट्रिक घेतली असे ट्विट केले होते.