भारतीय संघाचा गोलंदाज दीपक चहरनं वेस्ट इंडिजविरुद्धच्या तिसऱ्या वन डे सामन्यातून दुखापतीमुळे माघार घेतली होती. आगामी श्रीलंका आणि ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेसाठी भारतीय क्रिकेट नियामक मंडळानं ( बीसीसीआय) सोमवारी जाहीर केलेल्या संघातही त्याला स्थान मिळालेले नाही. त्यामुळे दीपक चहरची दुखापत गंभीर असल्याची बाब समोर येत आहे. जसप्रीत बुमराह आणि भुवनेश्वर कुमार यांच्या अनुपस्थितित मिळालेल्या संधीचं सोनं करताना प्रभावी कामगिरी केली, परंतु दुखापतीनं त्याला घेरलं. निवड समिती प्रमुख यांनी दिलेल्या माहितीनुसार दीपक चहर आगामी इंडियन प्रीमिअर लीगच्या ( आयपीएल 2020) काही सामन्यांना मुकण्याची शक्यता आहे. त्यामुळे चेन्नई सुपर किंग्सच्या चमूत चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
बांगलादेशविरुद्धच्या ट्वेंटी-20 मालिकेत त्यानं 7 धावांत 6 विकेट घेत विश्वविक्रमाची नोंद केली. ट्वेंटी-20 क्रिकेटमधील ही सर्वोत्तम गोलंदाजी आहे. शिवाय त्यानं या सामन्यात हॅटट्रिक घेतली आणि ट्वेंटी-20 हॅटट्रिक घेणारा तो पहिला भारतीय गोलंदाज ठरला. त्यानंतर सय्यद मुश्ताक अली ट्वेंटी-20 स्पर्धेत त्याची हॅटट्रिक थोडक्यात हुकली, परंतु त्यानं एका षटकात तीन विकेट्स घेतल्या. या कामगिरीच्या जोरावर त्यानं विंडीजविरुद्धच्या मालिकेत संघात स्थान पटकावले. दोन सामन्यात त्यानं साजेशी कामगिरी केली. पण, त्याला दुखापतीमुळे माघार घ्यावी लागली आणि नवदीप सैनीला संधी मिळाली.
टीम इंडियाचे निवड समिती प्रमुख एमएसके प्रसाद यांनी दीपकच्या दुखापतीबाबत चिंता वाढवणारी माहिती दिली. ते म्हणाले,''मार्च-एप्रिल पर्यंत दीपक पुनरागमन करेल, असे मला वाटत नाही. आमच्याकडे तीनही फॉरमॅटसाठी पुरेसा बॅकअप आहे. त्यामुळे टीम इंडियाला पुढील 6-7 वर्ष चिंता करण्याची गरज नाही.''
Web Title: Deepak Chahar’s return doubtful till March or April, confirms MSK Prasad
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.