भारतीय क्रिकेटपटू दीपक हूडा यानं बदोडा क्रिकेट संघटना सोडण्याचा निर्णय घेतला. त्याच्या निर्णयामागे कृणाल पांड्या हा कारणीभूत असल्याची चर्चा सुरू झाली आहे. या वर्षाच्या सुरूवातीला खेळवण्यात आलेल्या सय्यद मुश्ताक ट्वेंटी-२० स्पर्धेदरम्यान बडोदा संघात वाद झाला होता. कर्णधार कृणाल पांड्यानं शिवीगाळ केल्याचा आरोप करत दीपक हुडानं स्पर्धेतूनच माघार घेतली होती आणि त्यानंतर बडोदा क्रिकेट असोसिएशननं त्याच्यावर निलंबनाची कारवाई केली. त्यामुळेच दीपकनं आता बडोदा संघाकडून न खेळण्याचा निर्णय घेतला आहे. बडोदा क्रिकेट असोसिएशननंही त्याला ना हरकत प्रमाणपत्र दिले आहे. ( Deepak Hooda has sought NOC from the Baroda Cricket Association and the board is going to oblige with it: BCA official)
भारतीय महिलांनी ऐतिहासिक मालिका विजयाची संधी गमावली, पण स्मृती मानधना सॉलिड खेळली!
नेमकं काय घडलं होतं? सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी ट्वेंटी-20 बडोदा संघ वादामुळे चर्चेत आला होता. संघातील टॉप खेळाडू दीपक हुडानं या स्पर्धेतून माघार घेतली होती आणि त्यानं कर्णधार कृणाल पांड्या ( Krunal Pandya) यानं सहकाऱ्यांसमोर शिवीगाळ केल्याचा आरोप केला होता. उप कर्णधार दीपक हुडानं बडोदा क्रिकेट असोसिएशनकडे लेखी तक्रार केली होती. वडोदरा येथील रिलायन्स स्टेडियमवर सराव करताना दीपक आणि कृणाल यांच्यात वाद झाला होता. त्यानंतर दीपकनं बडोदा क्रिकेट असोसिएशनला मेल करून कृणालनं शिवीगाळ केल्याचा आरोप केला. शिवाय त्यानं या स्पर्धेतून माघार घेत असल्याचेही सांगितले.
दीपक हुडाची कामगिरी...दीपकनं ४६ प्रथम श्रेणी, ६८ लिस्ट ए आणि १२३ ट्वेंटी-20 सामने खेळले आहेत. दीपक हा इंडियन प्रीमिअर लीगमध्ये किंग्स इलेव्हन पंजाबचा सदस्य आहे. आयपीएल २०२१मध्ये दीपकनं ८ सामन्यांत ११६ धावा चोपल्या होत्या. दीपक हुडानं आयपीएल २०२१मध्ये राजस्थान रॉयल्सविरुद्ध झालेल्या सामन्यात २८ चेंडूंत ६४ धावा कुटल्या होत्या. त्यापैकी ५२ धावा या केवळ चौकार व षटकारानं आल्या. दीपक हुडाच्या या दमदार खेळीनंतर सोशल मीडियावर नेटिझन्सनी कृणाल पांड्याला ट्रोल केले होते.
भारतीय संघात भविष्यात स्थान पटकावणाऱ्या अशा अजून किती खेळाडूंना क्रिकेट संघटना गमावणार आहे?; दीपक हुडाचे बडोदा क्रिकेटला सोडणे हे मोठे नुकसान आहे. तो आणखी दहा वर्ष बडोदाकडून सहज खेळू शकला असता, असे मत इरफान पठाणनं व्यक्त केलं.