नवी दिल्ली - भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने वेस्ट-इंडीज संघासोबत भारतातच होत असलेल्या मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा केली. या संघात अनेकांना धक्का देणाऱ्या एका खेळाडूची निवड झाली आहे, ती म्हणजे दिपक हुड्डा. केवळ क्रिकेटप्रेमीच नाही तर स्वत: हुड्डालीह या निवडीचे आश्चर्य झाले असेल. कारण, 1 वर्षांपूर्वी परिस्थिती विचित्र होती. हुड्डा निराशेच्या गर्तेत गेला होता, अनिश्चतता आणि अपयशामुळे तो मनातून दु:खी बनला होता. मात्र, आता हुड्डावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. त्याचा, फोन कालपासून खणखणत आहे.
एक वर्षापूर्वी म्हणजेच 2021 च्या सुरुवातीला सैय्यद मुश्ताक अली ट्रॉफीची घोषणा झाली होती. मात्र, सामने सुरू होण्यापूर्वीच एका संध्याकाळी दिपक हुड्डाची बडोदा संघाचा कर्णधार क्रुणाल पंड्यासोबत जोरदार भांडण झालं. यावेळी, क्रुणालने आपलं करिअर संपवून टाकण्याची धमकी दिल्याचा आरोपही दिपकने केला होता. तर, बडोदा क्रिकेट असोसिएशनला पत्र लिहून हुड्डा टीमच्या बायो-बबलमधून बाहेर पडला. त्यामुळे, नियमांचे उल्लंघन आणि बायो बबलचे उल्लंघन केल्यामुळे बडोदा क्रिकेट असोसिएशनने संपूर्ण सिझनसाठी त्यास निलंबित केले होते. ज्यावेळी हुड्डाचे मित्र देशांतर्गत क्रिकेट संघात खेळत होते, तेव्हा तो स्वत:ला घरात बंद करुन बसला होता. आता आपलं क्रिकेट करिअर संपलं असेच त्याचे मत बनले होते.
हरयाणातील रोहतकमध्ये जन्मलेल्या दिपकने 11 वर्षे बडोदा संघासाठी क्रिकेट खेळलं आहे. त्यामुळेच, बडोदा संघाच्याच दोन सुपरस्टार्संनाच तो सध्याच्या सिलेक्शनचे क्रेडिट देत आहे. इरफान फठाण आणि युसूप पठाण यांनी माझी खूप मदत केली. निलंबित झाल्यानंतरही आयपीएलसाठी मला तयार केलं. येथील मोतीबाग मैदानात मी या दोघांसमेवत तासोंन तास नेट प्रॅक्टीस केली आहे. माझ्याकडून इरफान भाईने गोलंदाजीही करून घेतल्याचे दिपकने सांगितले. तसेच, निलंबित झाल्यानंतर भारतीय संघाचे माजी प्रशिक्षक अनिल कुंबळे यांनीही मोलाचे सहकार्य केले, आयपीएल खेळण्यासाठी माझ्यात विश्वास निर्माण केल्याचं हुड्डाने म्हटलं आहे. आता, भारतीय संघात निवड झाल्याने हुड्डा आनंदीत असून हुड्डाच्या या स्टोरीतून नक्कीच आपणास प्रेरणा मिळेल.