नवी दिल्ली : आशिया चषकात (Asia Cup 2022) सलग दुसरा विजय मिळवून भारतीय संघाने सुपर-4 मध्ये स्थान मिळवले आहे. ग्रुप ए आणि ग्रुप बी मधील प्रत्येकी 1-1 संघाने सुपर-4 मध्ये प्रवेश मिळवला आहे. ग्रुप ए मधून भारताने तर ग्रुप बी मधून अफगाणिस्तानने सुपर-4 मध्ये प्रवेश निश्चित केला आहे. भारतीय संघाने बुधवारी हॉंगकॉंगला पराभूत करून ही किमया साधली आहे. हॉंगकॉंगविरूद्धच्या सामन्यात हार्दिक पांड्याला प्लेइंग इलेव्हनमध्ये न घेण्याच्या निर्णयावरही टीका होत आहे. अनेक माजी खेळाडूंनी हार्दिकला विश्रांती देण्याचा निर्णय चुकीचा असल्याचे म्हटले आहे.
हार्दिकच्या जागी पंतला खेळवणे म्हणजे मोठी चूक भारतीय संघाचा माजी क्रिकेटपटू गौतम गंभीरने संघनिवड समितीवर टीका करताना म्हटले, "हार्दिक पांड्याला बाहेर ठेवल्याने मला आश्चर्य वाटले. बाहेर ठेवायचे होते तर दीपक हुड्डा याला संधी द्यायला हवी होती. हार्दिकच्या गैरहजेरीत संघात हुड्डालाच खेळवायला हवे होते, कारण हुड्डा गोलंदाजीही करू शकतो आणि फलंदाजीही", अशा शब्दांत गंभीरने काही प्रश्न उपस्थित केले.
तसेच रिषभ पंतला खेळवायचे होते तर त्याला दिनेश कार्तिकच्या जागी खेळवायला हवे होते, असेही गौतम गंभीरने म्हटले. अर्थात गंभीरच्या म्हणण्यानुसार रिषभ पंतला खेलवण्यासाठी पांड्याला विश्रांती देणे चुकीचे आहे. हार्दिक पांड्याला विश्रांती देण्याच्या निर्णयावरून क्रिकेट वर्तुळात मोठी चर्चा रंगली आहे. अनेक दिग्गजांनी यावर टीका देखील केली आहे. दीपक हुड्डा अद्याप आशिया चषकातील आपल्या पहिल्या सामन्याच्या प्रतीक्षेत आहे. हार्दिक पांड्याने पाकिस्तानविरूद्धच्या सामन्यात अष्टपैलू खेळी करून भारताला विजय मिळवून दिला होता. गोलंदाजी करताना त्याने 3 बळी पटकावले तर दुसऱ्या डावात 33 धावांची खेळी करून संघाच्या विजयाचे खाते उघडले.
सुपर-4 मध्ये केला प्रवेश हॉंगकॉंगच्या संघाने नाणेफेक जिंकून भारतीय संघाला फलंदाजी करण्यासाठी आमंत्रित केले. सुरूवातीला भारतीय फलंदाजांनी संयमी खेळी करून डाव पुढे नेला. हॉंगकॉंगच्या गोलंदाजांची गती अतिशय धीमी असल्यामुळे रोहित, विराटसह के.एल राहुल यांना मोठे फटकेबाजी करण्यास अडथळा येत होता. मात्र अखेरच्या काही षटकांमध्ये विराट कोहली आणि सूर्यकुमार यादवने शानदार खेळी करून हॉंगकॉंगसमोर तगडे आव्हान उभे केले. सूर्यकुमार यादवने 26 चेंडूंत 68 धावांची ताबडतोब खेळी करून हॉंगकॉंगच्या गोलंदाजांना घाम फोडला. तर विराट 44 चेंडूंत 1 चौकार व 3 षटकारांसह 59 धावांवर नाबाद राहिला. या दोघांनी 42 चेंडूंत 98 धावांची भागीदारी केली. अखेर भारताने 40 धावांनी सामना आपल्या नावावर केला. या विजयासह भारतीय संघाने अफगाणिस्तान पाठोपाठ सुपर-4 मध्ये प्रवेश केला.