दुबई : अष्टपैलू दीप्ती शर्मा हिने आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) जाहीर केलेल्या नव्या टी-२० क्रमवारीत गोलंदाजीत दुसरे स्थान पटकावले. आता तिचे लक्ष्य अव्वल स्थान काबीज करण्याकडे लागले आहे. इंग्लंडची सोफी एक्लेस्टोन अव्वल स्थानी आहे.
दक्षिण आफ्रिकेत सुरू असलेल्या त्रिकोणीय टी-२० मालिकेत दीप्ती सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये असून, तिने सर्वाधिक नऊ बळी घेतले आहेत. विशेष म्हणजे दीप्ती आणि अव्वल स्थानावरील एक्लेस्टोन यांच्यामध्ये केवळ २६ गुणांचे अंतर आहे. एक्लेस्टोनच्या खात्यात ७६३, तर दीप्तीच्या खात्यात ७३७ गुणांची नोंद आहे. दीप्तीने दक्षिण आफ्रिकेच्या नोनकुलुलेको एमलाबा (७३२) हिला मागे टाकत दुसरे स्थान काबीज केले. दोघींनी आपल्या कामगिरीत सातत्य राखले, तर १० फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या टी-२० विश्वचषक स्पर्धेआधी त्या एक्लेस्टोनला मागे टाकून अव्वल स्थान पटकावू शकतील. भारत आणि दक्षिण आफ्रिका गुरुवारी ईस्ट लंडन येथे त्रिकोणीय टी-२० मालिकेच्या अंतिम सामन्यात एकमेकांविरुद्ध भिडतील. भारताची डावखुरी फिरकीपटू राजेश्वरी गायकवाडनेही चार स्थानांनी प्रगती करत १४वे स्थान मिळवले आहे.
फलंदाजांमध्ये भारताची स्टार स्मृती मानधना हिने आपले तिसरे स्थान कायम राखले आहे. ऑस्ट्रेलियाची ताहलिया मॅकग्रा अव्वलस्थानी असून, ऑस्ट्रेलियाचीच बेथ मुनी दुसऱ्या स्थानावर आहे. न्यूझीलंडची सोफी डीवाइन आणि ऑस्ट्रेलियाची मेग लॅनिंग अनुक्रमे चौथ्या व पाचव्या स्थानावर आहेत. अष्टपैलू खेळांमध्येही दीप्तीने छाप पाडताना दुसरे स्थान कायम राखले आहे. ऑस्ट्रेलियाची ॲश्ले गार्डनर अव्वल अष्टपैलू ठरली आहे.
महिला क्रमवारीअव्वल ५ फलंदाज- ताहलिया मॅकग्रा (ऑस्ट्रेलिया) : ८०३- बेथ मूनी (ऑस्ट्रेलिया) : ७६५- स्मृती मानधना (भारत) : ७३१- सोफी डीवाइन (न्यूझीलंड) : ७१४- मेग लॅनिंग (ऑस्ट्रेलिया) : ६८६
अव्वल ५ गोलंदाजn सोफी एक्लेस्टोन (इंग्लंड) : ७६३n दीप्ती शर्मा (भारत) : ७३७n नोनकुलुलेको एमलबा (दक्षिण आफ्रिका) : ७३२n साराह ग्लेन (इंग्लंड) : ७२६n मेगन शट (ऑस्ट्रेलिया) : ७००