अखेरीस भारतीय संघाचे अभियान उपांत्य फेरीत संपुष्टात आले. ओल्ड ट्रॅफोर्डवर मंगळवारी झालेल्या पावसाने सामना राखीव दिवशी खेळवण्यात आला. खराब सुरूवातीनंतर जडेजा आणि धोनी यांनी आशा निर्माण केल्या होत्या. मात्र दोघेही बाद झाल्यानंतर आशा संपुष्टात आल्या. उपांत्य फेरी सारख्या मोठ्या सामन्यात धावा करण्याची जबाबदारी आघाडीच्या फळीची असते. मात्र ही आघाडीची फळी उध्वस्त झाली. विराट कोहली, लोकेश राहुल आणि रोहित शर्मा हे प्रत्येकी एक धाव करून बाद झाले. मात्र संपूर्ण स्पर्धेत टीकाकारांच्या निशाण्यावर असलेल्या मधल्या फळीने भारताचा डाव सावरला.
टॉप आॅर्डर स्वस्तात बाद झाल्यानंतर पंत व पांड्या यांच्याकडून संयमी खळाची अपेक्षा केली जाऊ शकत नाही. जडेजाने मात्र असाधारण खेळ दाखवला. तो विचार करूनच मैदानात उतरला होता असे दिसत होते. त्याला स्वत:ला सिद्ध करायचे होते. त्याने अर्धशतक करत टीकाकारांची तोंडे बंद केली. काही लोक म्हणतात की धोनीला फलंदाजीसाठी वरच्या क्रमांकावर पाठवायला हवे होते. मात्र मला तसे वाटत नाही. गेल्या काही काळापासून तो एक बाजू सांभाळून खेळण्यावर भर देत आहे.
२०१५ विश्वचषक व २०१६ टी२० विश्वचषकातही भारत उपांत्य फेरीतच पराभूत झाला होता. याबाबत एक बाब निश्चीतपणे लक्ष देण्यासारखी आहे, की जो संघ भारताला पराभूत करून अंतिम फेरीत जातो तोच अंतिम विजेता ठरतो. २०१५ च्या विश्वचषकात भारताला आॅस्ट्रेलियाने तर २०१६ टी२० विश्वचषकात भारताला विंडीजने पराभूत केले होते. अखेरीस हेच संघ विजेते ठरले.अयाझ मेमन कन्सल्टिंग एडिटर लोकमत