बाबर आझमच्या नेतृत्वातील पाकिस्तानी संघाने ट्वेंटी-२० विश्वचषक २०२४ मध्ये निराशाजनक कामगिरी केली. तेव्हापासून पाकिस्तान क्रिकेटमध्ये नाट्यमय घडामोडी घडत आहेत. निवड समितीतून वहाब रियाझ आणि अब्दुल रझाक यांची हकालपट्टी करण्यात आली. अशातच पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने आणखी एक मोठा निर्णय घेत खेळाडूंच्या केंद्रीय कराराचा कालावधी तीन वर्षांवरून एक वर्ष करण्याचा निर्णय घेतला. परंतु, खेळाडूंच्या पगारात कोणतीही कपात केली जाणार नाही. पीसीबीचे अध्यक्ष मोहसिन नक्वी यांनी लाहोरमध्ये बोलावलेल्या बैठकीत हे निर्णय घेण्यात आले.
या बैठकीला पाकिस्तानच्या कसोटी संघाचे प्रशिक्षक जेसन गिलेस्पी, वन डे आणि ट्वेंटी-२० संघाचे प्रशिक्षक गॅरी कर्स्टन, निवडकर्ते मोहम्मद युसूफ आणि असद शफीक, सहायक प्रशिक्षक अझहर महमूद आणि इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. ट्वेंटी-२० विश्वचषकात राष्ट्रीय संघाच्या खराब कामगिरीनंतर आपल्या धोरणांमध्ये आमूलाग्र बदल करण्याचा मानस असल्याचे पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने स्पष्ट केले. भारत आणि अमेरिकेविरूद्धच्या पराभवामुळे पाकिस्तानला विश्वचषकात सुपर-८ मध्ये प्रवेश मिळवता आला नाही.
PCB चा मोठा निर्णय
बोर्डाच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, निवडकर्त्यांनी केंद्रीय कराराच्या आर्थिक भागामध्ये कोणतेही बदल न करण्याची शिफारस केली. मात्र, आता करारामध्ये १२ महिन्यांच्या कालावधीत सुधारणा केली जाईल ज्यामध्ये खेळाडूंच्या फिटनेस, वर्तन आणि फॉर्मचे दर १२ महिन्यांनी मूल्यांकन केले जाईल. यावरूनच संबंधित खेळाडूची राष्ट्रीय संघातील जागा ठरेल.
दरम्यान, अमेरिका आणि आयर्लंड यांच्यातील सामना पावसामुळे रद्द झाल्याने पाकिस्तानचा संघ अधिकृतपणे विश्वचषकातून बाहेर झाला. पावसामुळे अमेरिका-आयर्लंड सामना उशीरा सुरू झाला. १० वाजेपर्यंत खेळपट्टीची पाहणीच सुरू होती आणि रेफरींनी ११.४६ वाजता मॅच सुरू होणार असल्याचे जाहीर केले. पावसामुळे विलंब झाल्याने ही लढत ५-५ षटकांची खेळवण्यात येणार होती. ११ वाजता खेळपट्टीची पाहणी करताना काही मैदानावरील काही ओल्या पृष्ठभागावर सामनाधिकाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली. तितक्यात पुन्हा एकदा ढगाळ वातावरण तयार झाले आणि वीजांचा कडकडाटही झाला. त्यामुळे पुन्हा खेळपट्टी झाकण्यात आली. सामनाधिकारी जवागल श्रीनाथने सामना रद्द झाल्याचे जाहीर केले आणि पाकिस्तानचा करेक्ट कार्यक्रम झाला.