Join us  

पराभवाचा वचपा! भारताचा दक्षिण आफ्रिकेवर 189 धावांनी विजय

पहिल्या कसोटीमध्ये दक्षिण आफ्रिकेनं विराटसेनेचा 72 धावांनी पराभव केला होता. त्याचा बदला भारतीय अंडर-19 च्या संघानं घेतला आहे. विश्वचषकापूर्वी...

By ऑनलाइन लोकमत | Published: January 09, 2018 6:46 PM

Open in App

केपटाऊन - पहिल्या कसोटीमध्ये दक्षिण आफ्रिकेनं विराटसेनेचा 72 धावांनी पराभव केला होता. त्याचा बदला भारतीय अंडर-19 च्या संघानं घेतला आहे. विश्वचषकापूर्वी झालेल्या सराव सामन्यात भारतीय संघानं दक्षिण आफ्रिकेच्या संघाचा 189 धावांनी पराभव केला.  अंडर-19 च्या वार्मअप सामन्यात पृथ्वी शॉच्या नेतृत्वाखालील भारतीय संघानं दक्षिण आफ्रिकेचा दारुण पराभव करत सिनियर संघाच्या पराभवाचा वचवा काढला. राहुल द्रविड सारख्या दिग्गज खेळाडू या संघाचा कोच आहे. 

क्राइस्टचर्च येथे झालेल्या सामन्यात कर्णधार पृथ्वी शॉनं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. कर्णधाराचा हा निर्णय फलंदाजांनी अचूक ठरवला. युवा संघातील अरुण जुयाल (86) आणि हिमांशू राणा (68) यांच्या अर्धशतकाच्या बळावर 50 षटकांमध्ये भारतीय संघानं 332 धावांचा डोंगर उभारला. अरुण आणि हिमांशू शिवाय अभिषेक शर्मा(35), अनुकुल रॉय(28) आणि कमलेश नगरकोटी(26) यांनीही महत्वपूर्ण योगदान दिले. भारतानं दिलेल्या 333 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना आफ्रिकेच्या फलंदाजीला सुरुवातीपासूनच गळती लागली.  दक्षिण आफ्रिकेचा पूर्ण संघ 38 षटकांमध्ये 143 धावांमध्ये गारद झाला.  भारताकडून इशान पोरेलने 4 बळी घेतले. त्याशिवाय कमलेश नगरकोटी आणि अभिषेक शर्माने 2-2 विकेट घेतल्या. 

यंदा न्यूझीलंडच्या भूमीवर 19 वर्षांखालील विश्वचषक क्रिकेट स्पर्धेचा महासंग्राम रंगणार आहे. या स्पर्धेचा उद्घाटन सोहळा रविवारी मोठ्या उत्साहात पार पडला. न्यूझीलंड क्रिकेटचे अध्यक्ष डेबी हॉकले यांनी स्पर्धेतील सर्व कर्णधारांचे स्वागत केले. या स्पर्धेला १३ जानेवारीपासून सुरुवात होत आहे. १४ जानेवारी रोजी भारताचा पहिला सामना ऑस्ट्रेलियाविरुद्ध होईल. भारतीय संघ ‘ब’ गटात आहे. त्यात ऑस्ट्रेलिया, झिब्बाब्वे आणि पापुआ न्यू गिनी यांचा समावेश आहे.  ‘अ’ गटात वेस्टइंडिज, न्यूझीलंड, दक्षिण आफ्रिका आणि केनिया यांचा, ब गटात ऑस्ट्रेलिया, भारत, पीएनजी आणि झिम्बाब्वे यांचा, तर क गटात बांगलादेश, कॅनडा, इंग्लंड, नामिबिया यांचा व ड गटात पाकिस्तान, श्रीलंका, अफगाणिस्तान आणि आयर्लंडचा समावेश आहे. गतवर्षी बांगलादेशमध्ये भारताला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले होते.

टॅग्स :क्रीडाक्रिकेटआयसीसी