लंडन : इंग्लंडचा माजी अष्टपैलू खेळाडू फिलिप डिफ्रेटास याने वर्णद्वेषाविषयी तोंड उघडले आहे. क्रिकेटमध्ये सक्रिय असताना ‘तू इंग्लंडकडून खेळल्यास गोळी मारू’ अशी धमकी मिळाल्याचा खुलासा या माजी खेळाडूने शनिवारी केला.
इंग्लंडकडून ४४ कसोटीत १४० तसेच १०३ वन डेत ११५ गडी बाद करणारा ५४ वर्षांचा डिफे्रटास म्हणाला,‘जिवे मारण्याची वारंवार धमकी मिळाल्यामुळेच माझी आंतरराष्ट्रीय कारकीर्द फार लहान ठरली. नॅशनल फ्रंटकडून हे धमकीचे पत्र मिळाले होते. त्यात लिहिले होते,‘इंग्लंडकडून खेळलास तर गोळी मारुन संपवून टाकू.’एकदा नव्हे तर दोन-तीन वेळा अशा धमक्या मिळाल्या.पोलीस माझ्या घरी तैनात असायचे.त्यावेळी माझ्याकडे माझे नाव लिहिलेली कार होती. कारवरुन ते नाव पुसून टाकावे लागले. लॉर्डस्वर कसोटी सामना सुरू होण्याआधी मी दोन दिवस हॉटेलच्या खोलीत सामना ‘खेळू की नको’ हाच विचार करीत होतो. तेथे बंदूक घेऊन कुणी तैनात तर असणार नाहीना, असा विचार सारखा मनात येत होता.’