अयाज मेमन - दुबई: सांघिक खेळाचे शानदार प्रदर्शन केलेल्या दिल्ली कॅपिटल्सने शानदार विजय मिळविताना सनरायझर्स हैदराबादचा आठ गड्यांनी पराभव केला. गोलंदाजांच्या जोरावर हैदराबादला २० षटकांत ९ बाद १३४ धावांत रोखल्यानंतर दिल्लीकरांनी १७.५ षटकांत २ बाद १३९ धावा करून बाजी मारली. कागिसो रबाडाची गोलंदाजी, तर शिखर धवन, श्रेयस अय्यर व कर्णधार ॠषभ पंत यांची फटकेबाजी दिल्लीसाठी मोलाची ठरली.सामना सुरू होण्याच्या काही तासांआधी वेगवान गोलंदाज टी. नटराजन कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याने हैदराबाद संघाला धक्का बसला. यानंतर त्यांना दिल्लीच्या वेगवान मारा सहन करता आला नाही. धावांचा पाठलाग करताना अनुभवी धवनने छाप पाडली. टी-२० विश्वचषकासाठी राष्ट्रीय निवड समितीचा भारतीय संघातून वगळण्याचा निर्णय चुकीचा असल्याचे दाखवून देत त्याने दिल्लीला सुरुवातीपासून विजयी मार्गावर ठेवले. तसेच दुखापतीनंतर पुनरागमन केलेल्या अय्यरनेही अखेरपर्यंत नाबाद राहत दिल्लीच्या विजयावर शिक्का मारला. पंतनेही सावध सुरुवातीनंतर मोक्याच्या वेळी आक्रमक पवित्रा घेत हैदराबादचा पराभव निश्चित केला. त्याआधी दिल्लीच्या गोलंदाजीचा सामना करण्यात हैदराबाद अपयशी ठरले.
फलंदाज ढेपाळले -डेव्हिड वॉर्नर सुरुवातीलाच झेलबाद झाल्याने हैदराबादला मोठा धक्का बसला. या धक्क्यातून त्यांना अखेरपर्यंत सावरता आले नाही. मधली फळीही अपयशी ठरल्याने त्यांच्या धावगतीला ब्रेक लागला. कागिसो रबाडाने ३७ धावांत ३ बळी घेत हैदराबादला अडचणीत आणले. वेगवान गोलंदाज ॲन्रीच नोर्खिया यानेही हैदराबादच्या फलंदाजीला खिंडार पाडताना १२ धावांत २, तर फिरकीपटू अक्षर पटेलने २१ धावांत २ बळी घेतले. दिल्लीच्या गोलंदाजांनी सातत्याने अचूक टप्प्यावर मारा करीत हैदराबादची १३ षटकांत ५ बाद ७४ अशी अवस्था केली होती.
महत्त्वाचे :- डेव्हिड वॉर्नर आयपीएलमध्ये आठव्यांदा शून्यावर बाद झाला.- यूएईमध्ये कागिसो रबाडाने पाचव्यांदा तीन बळी घेण्याची कामगिरी केली. त्याने मुंबई इंडियन्सच्या जसप्रीत बुमराहच्या कामगिरीशी बरोबरी केली आहे.- राशिद खान यंदाच्या वर्षी टी-२० क्रिकेटमध्ये ५० बळी घेणार पहिला गोलंदाज ठरला.- टी-२० क्रिकेटमध्ये श्रेयस अय्यरने चार हजार धावा पूर्ण केल्या.
स्कोअर कार्ड -