कोणाला कधी आणि कशी नशीबाची साथ मिळेल, याचा अंदाज बांधणे खरचं अवघड आहे. पण, ज्यांच्याकडे अथम परिश्रम करण्याची जिद्द असते नशीबाची साथ त्यांनाच मिळते. भारतातील एका क्रिकेटपटूनं आपल्या उल्लेखनीय कामगिरीच्या जोरावर थेट केनियाच्या राष्ट्रीय संघाच्या उंबरठ्यापर्यंत मजल मारली आहे. पुष्कर शर्मा असे या खेळाडूचे नाव आहे. मुळचा दिल्लीच्या या खेळाडूनं मुंबईच्या क्लब क्रिकेटमध्ये उल्लेखनीय कामगिरी करून सर्वांचे लक्ष वेधले आहे.
भारतीय क्रिकेटपटूची आई बनली 'कोरोना वॉरियर'; संकटकाळात करतेय 'बेस्ट' काम!
मुंबई शालेय क्रिकेट स्पर्धेतील कामगिरीच्या जोरावर पुष्करनं 16 वर्षांखालील संघात स्थान पटकावलं. मेहनती आणि दृढनिश्चयी पुष्करच्या आयुष्यात चढ-उतार नेहमी राहिले. तो 17 वर्षांचा असताना त्याच्या डोक्यावरील वडिलांचे छत्र हरवले. वडिलांच्या निधनाचे दुःख आणि कुटुंबाची जबाबदारी सांभाळतानाही त्यानं क्रिकेटपटू बनण्याचे स्वप्न पाहणे सोडलं नाही. या दृढनिश्चयाचा त्याला फळ मिळालं आणि त्याला इंडिया फर्स्ट लाईफ इन्सुरन्स कंपनीकडून खेळण्याची संधी मिळाली.
कॉर्पोरेट क्रिकेटमध्ये दमदार कामगिरी केल्यानंतर त्याला आफ्रिकेतील प्रसिद्ध स्पर्धेत त्याला खेळण्याची संधी मिळाली. पुष्करने या स्पर्धेत 4 सामन्यांत 3 अर्धशतकं झळकावली. त्याच्या खेळानं प्रभावित झालेल्या आफ्रिकेतील हिरानी टेलिकम्युनिकेशन कंपनीनं त्याला तिथेच थांबून त्यांच्या कंपनीत काम करण्याची ऑफर दिली. पुष्करने त्याचा स्वीकार केला आहे. आता तो तिथे रुरका स्पोर्ट्स क्लबकडून खेळत असून कदाचित काही दिवसांत त्याला केनियाच्या राष्ट्रीय संघाकडून खेळण्याची संधी मिळू शकते.