shane watson ipl 2023 । नवी दिल्ली : भारतीय संघाचा माजी कर्णधार विराट कोहली आणि सौरव गांगुली यांच्यात आयपीएल २०२३ च्या मध्याला वाद झाल्याचे पाहायला मिळाले. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि दिल्ली कॅपिटल्स (RCB vs DC) यांच्यातील सामन्यातील विराट कोहलीचा एक फोटो व्हायरल झाला होता, ज्यामध्ये तो बाकावर बसलेल्या सौरव गांगुली यांना खुन्नस देताना दिसत आहे. याशिवाय सामना झाल्यानंतर दोन्ही खेळाडूंनी हस्तांदोलन करणे देखील टाळले होते. त्यामुळे वादाच्या चर्चेचा उधाण आले आहे. अशातच दिल्ली कॅपिटल्सच्या संघाचा सहाय्यक प्रशिक्षक शेन वॉटसनने यावर एक मोठा खुलासा केला आहे.
शेन वॉटसनला या वादाबद्दल प्रश्न विचारला असता त्याने म्हटले, " ही एक अफवा असू शकते पण मला खात्री आहे, विराट कोहली त्या दिवशी मैदानावर खूप रागावलेला दिसला. तो नेहमी मैदानात अशा स्थितीत असतो आणि जेव्हा तो आक्रमक असतो तेव्हा सर्वोत्तम कामगिरी करत असतो. पण मला नीट माहीत नाही नक्की काय झाले?". हे विधान करताना शेन वॉटसन आणि शोचे होस्ट दोघेही हसले, यावरून अंदाज लावला जाऊ शकतो की शेन वॉटसनला या प्रकरणाची माहिती आहे पण तो या सर्व गोष्टींवर मीडियामध्ये चर्चा करू इच्छित नाही. एकूणच विराट रागात दिसल्याचे बोलून वॉटसन आपल्या सहकाऱ्याचा बचाव करताना दिसला.
दरम्यान, दिल्ली आणि बंगळुरू यांच्यातील सामन्यानंतर अनेक नाट्यमय घडामोडी घडल्या. सामन्यानंतर विराट आणि गांगुली यांना एकमेकांना हस्तांदोलन केले नसल्याचे पाहायला मिळाले. याला चाहते कर्णधारपदाच्या वादासोबत जोडत आहेत. ट्वेंटी-२० विश्वचषक २०२१ नंतर अंतर्गत वादामुळे विराट कोहलीने कसोटी क्रिकेटचे कर्णधारपद सोडले होते. त्यानंतर वन डे क्रिकेटच्या कर्णधारपदावरून त्याला हटवण्यात आले.
विराट कोहली-सौरव गांगुली वाद; गोष्टी कशा सुरू झाल्या?दक्षिण आफ्रिका दौऱ्यापूर्वी बीसीसीआयने विराट कोहलीला भारताच्या वन डे कर्णधारपदावरून हटवल्यानंतर गांगुली-कोहली वाद सुरू झाला. या निर्णयामुळे विराट नाराज झाला होता आणि एका ज्वलंत पत्रकार परिषदेत त्याने काही धाडसी दावे केले होते. विराटने सांगितले की, बीसीसीआयने वन डे नेतृत्वातील बदलाबाबत कोणतीही चर्चा केलेली नाही आणि त्याला फोन कॉलवर संघ रवाना होण्याच्या काही तासांपूर्वीच याबद्दल माहिती देण्यात आली होती. कोहलीच्या शब्दांनी गांगुलीच्या दाव्याचे खंडन केले की त्याने विराट कोहलीला ट्वेंटी-२०चे कर्णधारपद सोडू नये कारण बोर्डाला विभाजित कर्णधारपद नको आहे. गांगुली म्हणाला की, विराट कोहलीने भारताच्या ट्वेंटी-२०च्या कर्णधारपदावरून पायउतार होण्याचा निर्णय घेतल्याने बोर्डाने त्याला वन डे कर्णधारपदावरून काढून टाकले आणि रोहित शर्माकडे कर्णधारपद सोपवले.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"