Join us  

RCB vs DC: USAच्या खेळाडूसमोर 'स्मृती'ची RCBगारद; शेफालीच्या 84 धावा अन् दिल्लीची विजयी सलामी 

WPL 2023: महिला प्रीमियर लीगचा दुसरा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात खेळवला गेला. 

By ऑनलाइन लोकमत | Published: March 05, 2023 6:54 PM

Open in App

tara norris, shafali verma wpl । मुंबई : आज महिला प्रीमियर लीगचा दुसरा सामना दिल्ली कॅपिटल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात खेळवला गेला. स्पर्धेतील आपल्या पहिल्याच सामन्यात दिल्लीच्या संघाने शानदार सुरूवात केली आहे. कर्णधार मेग लॅनिंग आणि शेफाली वर्मा यांच्या जोडीने आरसीबीच्या गोलंदाजीला सुरूंग लावला आणि मोठी भागीदारी नोंदवली. दिल्ली कॅपिटल्सच्या संघाने सांघिक खेळी करून विजयी सलामी दिली आहे. शेफाली आणि मेग या दोघींनी पहिल्या बळीसाठी 162 धावांची विक्रमी भागीदारी नोंदवली. दुसऱ्या डावात तारा नॉरिसने 5 बळी घेऊन आरसीबीला पराभवाचा धक्का दिला. नॉरिसच्या यशस्वी गोलंदाजीमुळे दिल्लीने 60 धावांनी मोठा विजय मिळवला. 

तत्पुर्वी, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या संघाने नाणेफेक जिंकून दिल्लीच्या संघाला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले. दिल्लीची सलामीवीर शेफाली वर्मा (84) आणि मेग लॅनिंग (72) यांनी स्फोटक खेळी केली. कर्णधार लॅनिंगने 43 चेंडूत 14 चौकारांच्या मदतीने 72 धावा चोपल्या. तर शेफाली वर्माने 45 चेंडूत 10 चौकार आणि 4 षटकारांच्या जोरावर 84 धावा केल्या. 14 षटकांपर्यंत आरसीबीला एकही बळी घेता आला नाही, मात्र पंधराव्या षटकांत हेथर नाईट हिने दिल्लीच्या दोन्ही सलामीवीरांना बाहेरचा रस्ता दाखवला. शेफाली-लॅनिंगच्या जोडीने स्फोटक सुरूवात केल्यानंतर जेमिमा आणि मारिझान कॅप यांनी शानदार खेळीकरून धावसंख्या 200 पार नेली. दक्षिण आफ्रिकेची खेळाडू मारिझान कॅप हिने 17 चेंडूत 3 चौकार आणि 3 षटकारांच्या मदतीने 39 धावांची ताबडतोब खेळी केली, तर जेमिमा रॉड्रिग्जने नाबाद 22 धावा केल्या. अखेर दिल्लीच्या संघाने 20 षटकांत 223 धावा करून स्मृती मानधनाच्या आरसीबीला विजयासाठी 224 धावांचे तगडे आव्हान दिले. 

224 धावांच्या तगड्या आव्हानाचा पाठलाग करताना आरसीबीच्या संघाने शानदार सुरूवात केली. कर्णधार स्मृती मानधना हिने 23 चेंडूत 35 धावा करून आरसीबीच्या चाहत्यांना जागे केले. पण स्मृतीची ही झुंज अयशस्वी ठरली आणि ती अॅलिस कॅप्सीची शिकार झाली. स्मृतीनंतर एलिसे पेरी हिने (31) डाव सावरण्याचा प्रयत्न केला पण तारा नॉरिसने तिला देखील बाहेरचा रस्ता दाखवून आरसीबीच्या फलंदाजीची कंबर मोडली. यूएसएची खेळाडू तारा नॉरिस हिने 4 षटकांत 29 धावा देत 5 बळी घेतले, तर लिस कॅप्सी (2) आणि शिखा पांडेला (1) बळी घेण्यात यश आले. अखेर आरसीबीचा संघ 20 षटकांत 8 बाद केवळ 163 धावा करू शकला आणि दिल्लीच्या संघाने 60 धावांनी मोठा विजय मिळवला. 

 आजच्या सामन्यासाठी RCBचा संघ - स्मृती मानधना (कर्णधार), सोफी डिव्हाईन, दिशा कासट, एलिसे पेरी, रिचा घोष (यष्टीरक्षक), हेथर नाईट, कानिका अहुजा, सोभना आशा, मेगन शुट, प्रीती बोस, रेणुका सिंग. 

आजच्या सामन्यासाठी दिल्ली कॅपिटल्सचा संघ -मेग लॅनिंग (कर्णधार), शेफाली वर्मा, मारिझान कॅप, जेमिमा रॉड्रिग्ज, अॅलिस कॅप्सी, जेस जॉनसन, तानिया भाटिया (यष्टीरक्षक), अरूधंती रेड्डी, शिखा पांडे, राधा यादव, तारा नॉरिस. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

 

टॅग्स :महिला प्रीमिअर लीगदिल्ली कॅपिटल्सरॉयल चॅलेंजर्स बेंगलोरस्मृती मानधनाभारतीय महिला क्रिकेट संघ
Open in App