meg lanning delhi capitals । मुंबई : मुंबईत महिला प्रीमिअर लीगचा (WPL) थरार रंगला आहे. दिल्ली कॅपिटल्सचा दारूण पराभव करून मुंबई इंडियन्सच्या संघाने विजयाची हॅटट्रिक लगावली आहे. WPL 2023 मध्ये दिल्ली कॅपिटल्सला पहिल्या दोन सामन्यांमध्ये विजय मिळवण्यात यश आले. पण, गुरूवारी दिल्लीला स्पर्धेतील पहिल्या पराभवाला सामोरे जावे लागले. या सामन्यात मुंबई इंडियन्सने दिल्ली कॅपिटल्सचा जबरदस्त पराभव करत सलग तिसरा विजय नोंदवला. मुंबईच्या संघाने दिल्लीच्या फलंदाजांना घाम फोडला आणि 20 षटके देखील खेळू दिली नाहीत. दिल्ली कॅपिटल्सच्या पराभवानंतर कर्णधार मेग लॅनिंगने मुंबई इंडियन्सच्या गोलंदाजांचे कौतुक करताना पराभवाची जबाबदारी स्वीकारली.
दरम्यान, नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना दिल्ली कॅपिटल्सची सुरुवात अत्यंत निराशाजनक झाली. प्रथम फलंदाजी करताना दिल्ली कॅपिटल्सचा संघ 18 षटकांत सर्वबाद 105 धावांवर आटोपला. दिल्लीकडून कर्णधार मेग लॅनिंगने 41 चेंडूत पाच चौकारांच्या मदतीने सर्वाधिक 43 धावा केल्या. संघातील केवळ तीन फलंदाजांना दुहेरी आकडी धावसंख्या गाठता आली. प्रत्युत्तरात मुंबई इंडियन्सने 15 षटकांत 2 बाद 109 धावा करून सामना जिंकला. अशाप्रकारे मुंबईने सलग तिसऱ्या विजयाची नोंद केली, तर दिल्लीला पहिला पराभव स्वीकारावा लागला.
मी हळू सुरूवात केली - मेग लॅनिंगसामन्यानंतर, दिल्ली कॅपिटल्सची कर्णधार मेग लॅनिंगने पराभवाची जबाबदारी स्वीकारत स्वत:ला दोषी ठरवले. दिल्लीची धावसंख्या 12-13 षटकांपर्यंत मुंबई इंडियन्स सारखीच होती, परंतु नंतर काही गोष्टी आमच्या बाजूने वळल्या नाहीत, असे तिने सांगितले.
मेग लॅनिंगने सामन्यानंतर म्हटले, "खरं तर 12-13 षटकांनंतर आम्ही अगदी सारख्याच स्थितीत होतो. मला थोडे अपराधी वाटते कारण मी सुरुवातीला काही चेंडू घेतले आणि नंतर धावा करू शकले नाही. मुंबईने शानदार गोलंदाजी केली आणि हाच खेळ आहे, कधी कधी गोष्टी तुमच्या मनाप्रमाणे होत नाहीत. आम्ही खेळलेल्या इतर खेळपट्ट्यांच्या तुलनेत ही खेळपट्टी थोडी वेगळी होती. तुम्ही मैदानात जाऊन सुरुवातीपासून 180 धावा करायचे असे लक्ष्य ठेवू शकत नाही. जर तुम्ही असे केले तर तुम्ही स्वतःला थोडे अडचणीत आणाल. तो आमचा सर्वोत्तम दिवस नव्हता. पण खूप काही शिकण्यासारखे आहे."
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"