संघ व्यवस्थापन सध्या संघातील प्रत्येक खेळाडूच्या भूमिकेबाबत चर्चा करत असल्याची माहिती दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार रिषभ पंतनं दिली आहे. आयपीएल २०२२ शनिवारपासून सुरू होत आहे ज्यामध्ये पहिला सामना गतविजेता चेन्नई सुपर किंग्ज आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात वानखेडे स्टेडियमवर होणार आहे. पंत दुसऱ्यांदा दिल्लीचे कर्णधारपद भूषवत आहे. संघातील प्रत्येक सदस्याकडे प्रचंड आत्मविश्वास आहे, असंही पंत म्हणाला.
"नवाच संघ तयार झालाय असं वाटतंय. मी प्रत्येकाकडे पाहात होतो. कोण काय करतंय ते पाहात होतो. सर्वजण एन्जॉय करत आहेत. सध्या आम्ही सराव शिबिरांमधून कुणाला नेमकी कशाची गरज आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहोत. संघासाठी कोणत्या गोष्टी उपयुक्त आहेत त्याची माहिती प्रत्येक खेळाडूला देण्यात येत आहे. सामन्यावेळी प्रत्येकाची भूमिका काय असेल हे सांगण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत", असं रिषभ पंत म्हणाला.
पाँन्टिंगसोबतची भेट खूप खासJSW आणि GMR च्या दिल्ली कॅपिटल्स संघानं यंदा अनेक नव्या खेळाडूंची निवड केली आहे. कर्णधार पंत पहिल्या सराव सत्रात सहभागी झाला होता. मुख्य प्रशिक्षक रिकी पाँटिंगसोबत काम करण्याचा अनुभव पंतनं शेअर केला. "रिकी पाँटिंगला भेटणं नेहमीच खास असतं. जेव्हाही मी त्याला भेटतो तेव्हा कुटुंबातील सदस्याला भेटल्यासारखं वाटतं. ते प्रत्येक खेळाडूमध्ये ऊर्जा भरतात. प्रत्येकजण त्यांच्याकडून प्रेरणा घेतो आणि त्यांचं ऐकण्यास उत्सुक असतो", असं रिषभ पंत म्हणाला.
पहिल्या जेतेपदाची उत्सुकतादिल्ली कॅपिटल्सला अद्याप एकदाही आयपीएल ट्रॉफी उंचावता आलेली नाही. दिल्लीला केवळ एकदाच फायनल खेळता आली आहे. ज्यात मुंबई इंडियन्सकडून पराभव झाला होता. श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली दिल्लीनं 2020 मध्ये अंतिम सामना खेळला पण ते विजेतेपद मिळवू शकले नाहीत. गेल्या वर्षी श्रेयसच्या दुखापतीमुळे पंतला कर्णधारपद मिळालं आणि फ्रँचायझीनं अय्यरच्या आगमनानंतरही पंतचं कर्णधारपद कायम ठेवलं होतं. यंदा पंत संपूर्ण हंगामात संघाचं नेतृत्व करेल आणि संघाला पहिले विजेतेपद मिळवून देण्याचा प्रयत्न करेल. संघाला ब्रेबॉर्न स्टेडियमवर २७ मार्चला मुंबई इंडियन्सविरुद्ध पहिला सामना खेळायचा आहे.