KL Rahul Delhi Capitals, IPL 2025 : आयपीएलचा नवा हंगाम २१ मार्चपासून सुरू होणार आहे. पण त्याआधी, दिल्ली कॅपिटल्स फ्रँचायझीच्या नवीन कर्णधाराबाबत चर्चा रंगल्या आहेत. गेल्या हंगामापर्यंत यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंत या संघाचे नेतृत्व करत होता. पण दिल्लीने पंतला करारमुक्त केले. पंत लखनौ सुपर जायंट्स (LSG) कडून सर्वात महागडा खेळाडू म्हणून खेळणार आहे. मेगालिलावात दिल्ली संघाने यष्टिरक्षक फलंदाज केएल राहुलला १४ कोटी रुपयांना खरेदी केले आहे. गेल्या हंगामापर्यंत राहुल लखनौ संघाचे नेतृत्व करत होता. अशा परिस्थितीत राहुलला दिल्ली संघाचे कर्णधारपद मिळू शकते अशी चर्चा होती. पण संघात फाफ डू प्लेसिस आणि अक्षर पटेल (Axar Patel) यांचाही समावेश आहे. त्यामुळे आता त्याच्याऐवजी दुसऱ्या एका खेळाडूला ही जबाबदारी दिली जाऊ शकते असे बोलले जात आहे.
हा अनुभव खेळाडू भूषवू शकतो संघाचे कर्णधारपद
एक असा अहवाल समोर आला आहे ज्यात वेगळीच माहिती समोर आली आहे. एएनआयच्या वृत्तानुसार, दिल्ली फ्रँचायझी केएल राहुलला कर्णधारपद देण्याच्या मनःस्थितीत नाही. त्याच्या जागी संघाचे नेतृत्व स्टार फिरकी अष्टपैलू खेळाडू अक्षर पटेलकडे सोपवू शकते. अक्षर २०१९ पासून या फ्रँचायझीसोबत जोडला गेलेला आहे. या काळात त्याने कर्णधाराच्या अनुपस्थितीत काही सामन्यांमध्ये संघाचे नेतृत्वही केले आहे. त्यामुळे आता संघ अक्षरला नियमित कर्णधार बनवू शकतो असा अंदाज आहे. राहुल व्यतिरिक्त, फ्रँचायझीने मेगा लिलावात फाफ डू प्लेसिसलाही २ कोटी रुपयांना खरेदी केले आहे. गेल्या हंगामात डू प्लेसिसने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB)चे नेतृत्व केले होते. अशा परिस्थितीत, या दोघांऐवजी अक्षरला कर्णधारपदासाठी निवडल्यास दिल्लीचा अक्षरवर किती जास्त विश्वास आहे, हे स्पष्ट दिसून येते.
फ्रँचायझीच्या मालकांनीही दिली हिंट
भारतीय संघाला इंग्लंडविरुद्धची पुढची मालिका घरच्या मैदानावर खेळायची आहे. सुरुवातीला दोन्ही संघांमध्ये ५ सामन्यांची टी-२० मालिका आणि नंतर ३ सामन्यांची एकदिवसीय मालिका होईल. अक्षर पटेलला टी२० मालिकेसाठी भारतीय संघाचे उपकर्णधारपद देण्यात आले आहे. अशा परिस्थितीत, दिल्ली फ्रँचायझी जर त्याला आपला कर्णधार बनवत असेल तर त्यात काहीच धक्कादायक नसेल. अलिकडेच दिल्ली फ्रँचायझीचे मालक पार्थ जिंदाल यांनीही अक्षरकडे कर्णधारपद सोपवण्याचे संकेत दिले होते. त्यांनी ESPNcricinfo ला सांगितले होते की, 'कर्णधारपदाबद्दल आत्ताच बोलणे थोडे घाईचे ठरेल. अक्षर पटेल बऱ्याच काळापासून फ्रँचायझीसोबत आहे. गेल्या हंगामात तो उपकर्णधारही होता. पण आम्हाला आताच सांगणे कठीण आहे की अक्षर कर्णधार असेल की दुसरा कोणी असेल.