Coronavirus in Delhi Capitals, IPL 2022: च्या मोसमात कोरोनाने पुन्हा एकदा स्पर्धेत शिरकाव केला आहे. कोरोना व्हायरसने दिल्ली कॅपिटल्सच्या (डीसी) कॅम्पमध्ये पुन्हा थैमान घातले आहे. दिल्ली संघाच्या एका खेळाडूला संसर्ग झाल्याचे आढळून आले आहे. हा खेळाडू नेट बॉलर आहे. त्यानंतर पुढील आदेश येईपर्यंत या टीमला हॉटेलमध्ये सक्तीच्या आयसोलेशनमध्ये राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. या सर्व खेळाडू आणि कर्मचार्यांची आणखी एक RT-PCR चाचणी केली गेली आहे, त्याचा अहवाल अद्याप आलेला नाही.
दिल्ली कॅपिटल्सला रविवारी संध्याकाळी चेन्नई सुपर किंग्ज (CSK) विरुद्ध त्यांचा पुढील सामना खेळायचा आहे. यासाठी रविवारी सकाळी सर्व खेळाडू आणि कर्मचाऱ्यांची चाचणी घेण्यात आली, त्यात एका नेट बॉलरची चाचणी पॉझिटिव्ह आली. याआधीही २० एप्रिल रोजी दिल्ली संघात कोरोनाचे काही रुग्ण आढळले होते. संघातील कोरोना पॉझिटिव्हची ही आठवी घटना आहे. याआधी, फिजिओ पॅट्रिक फरहार्ट, ऑस्ट्रेलियन अष्टपैलू मिचेल मार्श आणि न्यूझीलंडचा यष्टिरक्षक टिम सेफर्ट यांच्यासह स्टाफ सदस्यांनाही संसर्ग झाल्याचे आढळले होते. यामुळेच दिल्ली संघाचे मुख्य प्रशिक्षक रिकी पाँटिंग यांनाही क्वारंटाईनमध्ये राहावे लागले होते. २२ एप्रिलला राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या सामन्यात दिल्लीचा संघ पाँटिंगशिवाय मैदानात उतरला. गेल्या ७ प्रकरणांमध्ये सर्व लोक बरे झाले. मात्र आता हे आठवे प्रकरण आहे.
दरम्यान, रिषभ पंतच्या नेतृत्वाखालील दिल्ली कॅपिटल्सने चालू हंगामात आतापर्यंत १० सामने खेळले आहेत, त्यापैकी ५ सामने जिंकले आहेत. हा संघ १० गुणांसह गुणतालिकेत पाचव्या क्रमांकावर आहे. प्ले-ऑफमधील आपले स्थान पक्के करण्यासाठी दिल्ली संघाला आता त्यांच्या उर्वरित ४ पैकी किमान ३ सामने जिंकावेच लागतील. दिल्ली संघाचा पुढील सामना रविवारी संध्याकाळी महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखालील चेन्नई संघाशी होणार आहे.