मुंबई : मुंबई इंडियन्सच्या कर्णधारपदी हार्दिक पांड्याची वर्णी लागली अन् क्रिकेट विश्वात एकच खळबळ माजली. आयपीएल आपल्या आगामी हंगामाकडे कूच करत आहे. अशातच मुंबई इंडियन्सच्या फ्रँचायझीने शुक्रवारी एक मोठी घोषणा करत हार्दिक पांड्याकडे कर्णधारपदाची जबाबदारी सोपवली. रोहित शर्मा कर्णधारपदावरून पायउतार झाल्यानंतर चाहते रोष व्यक्त करत आहे. आयपीएलमधील सर्वात यशस्वी कर्णधारांच्या यादीत महेंद्रसिंग धोनी आणि रोहित शर्मा यांचा समावेश आहे. रोहितच्याच नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्सने आयपीएलचे पहिले विजेतेपद पटकावले होते. याशिवाय रोहितच्यात नेतृत्वात मुंबईने पाचवेळा आयपीएलचा किताब उंचावला. पण शुक्रवारी या फ्रँचायझीने सर्वांना चकित करत मोठा निर्णय घेतला.
लक्षणीय बाब म्हणजे दिल्ली कॅपिटल्सने रोहित शर्माशी ट्रेड करण्यासाठी मुंबई इंडियन्सशी संपर्क साधला होता. 'स्पोर्ट्स टुडे'ने दिलेल्या वृत्तानुसार, दिल्लीच्या फ्रँचायझीने ट्रेडसाठी रोहितशी संपर्क साधला होता. पण, मुंबईच्या फ्रँचायझीने या ऑफरला नकार देत करार नाकारला. मुंबई इंडियन्सच्या कर्णधारपदावरून पायउतार झाल्यानंतर दिल्लीची फ्रँचायझी कर्णधारपदाचा चेहरा म्हणून रोहितकडे पाहत होती, असेही कळते.
रोहित अन् मुंबई इंडियन्स आयपीएलच्या इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधारांपैकी एक म्हणजे रोहित शर्मा. हिटमॅनच्या नेतृत्वात मुंबईने पाचवेळा आयपीएलचा किताब जिंकला आहे. २०१३, २०१५, २०१७, २०१९ आणि २०२० मध्ये किताब पटकावण्यात मुंबई इंडियन्सच्या संघाला यश आले. मुंबईशिवाय चेन्नई सुपर किंग्जने देखील पाचवेळा जेतेपद पटकावण्याची किमया साधली.
दरम्यान, हार्दिक पांड्याच्या नेतृत्वात गुजरात टायटन्सने आपल्या पदार्पणाच्या (२०२२) हंगामातच विक्रम नोंदवला. पांड्याच्या नेतृत्वातील गुजरातच्या संघाला पहिल्याच हंगामात किताब जिंकण्यात यश आलं. मात्र, हार्दिकच्या जाण्याने गुजरात टायटन्सला मोठा धक्का बसला. खरं तर गुजरातच्या संघात अनुभवी आणि युवा खेळाडूंची मोठी फळी असून शुबमन गिल व्यतिरिक्त, केन विल्यमसन, मोहम्मद शमी, वृद्धिमान साहा, विजयशंकर, साई किशोर, राशिद खान, डेव्हिड मिलर हे नामांकित खेळाडू गुजरातच्या ताफ्यात आहेत. त्यामुळे संघ व्यवस्थापनाने गुजरातच्या संघाची धुरा भारताचा स्टार फलंदाज शुबमन गिलच्या खांद्यावर सोपवली. गिलसह टायटन्सच्या सर्व खेळाडूंनी मागील दोन हंगामात चमकदार कामगिरी केली आहे. त्यांचे नेतृत्व करण्यात हार्दिक यशस्वी ठरला.