दुबई: दिल्ली कॅपिटल्सने आपलाच वेगवान गोलंदाज ॲन्रीच नॉर्खियाला गुन्हेगार ठरवले आहे. इतकेच नाही, तर त्याला दंडही लावा, असेही म्हटले आहे. आयपीएलच्या यंदाच्या सत्रात सर्वात वेगाने चेंडू टाकण्याचा मान नॉर्खियाने मिळवला. यंदाच्या आयपीएलमधील पहिले आठ वेगवान चेंडू हे नॉर्खियाचेच आहेत. त्यातही हैदराबादविरुद्ध त्याने चक्क ४ वेळा १५० प्रतितासहून अधिकच्या वेगाने चेंडू फेकला आहे.
त्यामुळेच दिल्लीने प्रतिस्पर्धी संघांना इशारा देताना एक धमाल कॅरिकेचर ट्विटरवर पोस्ट केले असून, यामध्ये नॉर्खियाच्या हातात गुन्हेगाराप्रमाणे एक पाटी दिल्याचे दाखवले आहे. यावर लिहिले आहे की, ‘ॲन्रीच नॉर्खिया. बॉलर. वेगाचे उल्लंघन १५१.७१ प्रतितास’ नॉर्खिया यंदा आयपीएलमध्ये आतापर्यंतचा सर्वात वेगवान गोलंदाज ठरला असून त्याने हैदराबादविरुद्ध १५१.७१ प्रतितास इतक्या वेगाने गोलंदाजी केली आहे. दिल्लीचे हे धमाल ट्विट सध्या चांगलेच व्हायरल होत आहे.