नवी दिल्ली : जगातील सर्वात लोकप्रिय ट्वेंटी-20 लीग अर्थात आयपीएल आपल्या आगामी हंगामाकडे कूच करत आहे. अशातच भारतीय संघाचे माजी कर्णधार आणि आयपीएलच्या आगामी हंगामातील दिल्ली कॅपिटल्सचे संचालक सौरव गांगुली यांनी यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंत आयपीएल 2023 मध्ये खेळणार नसल्याचे म्हटले आहे. लक्षणीय बाब म्हणजे रिषभ पंत सध्या अपघातात झालेल्या दुखापतीतून सावरत आहे.
दरम्यान, डिसेंबरमध्ये रिषभ पंतचा दिल्ली-देहराडून महामार्गावर भीषण कार अपघात झाला होता. या अपघातात पंतला गंभीर दुखापत झाली होती. अपघातानंतर पंत याला प्रथम जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले आणि त्यानंतर चांगल्या उपचारासाठी देहराडून येथील मॅक्स रुग्णालयात पाठवण्यात आले होते. मात्र, पंतला त्याच्या उजव्या पायाच्या शस्त्रक्रियेसाठी देहराडूनहून विमानाने मुंबईतील कोकिलाबेन धीरूभाई अंबानी रुग्णालयात नेण्यात आले आहे. सध्या तो मुंबईत दुखापतीतून सावरत आहे. तर दुसरीकडे सौरव गांगुली यांनी पंतच्या आयपीएल खेळण्याबाबत मोठा खुलासा केला आहे.
IPL 2023 खेळणार नाही पंत - गांगुली रिषभ पंतच्या आयपीएल 2023 मध्ये खेळण्याबाबत सौरव गांगुली यांनी मोठे वक्तव्य केले. स्पोर्ट्स टुडेशी बोलताना गांगुली यांनी म्हटले, "रिषभ पंत आयपीएलसाठी उपलब्ध होणार नाही. मी दिल्ली कॅपिटल्सच्या फ्रँचायझीचा हिस्सा आहे. हा आयपीएल संघासाठी उत्तम असेल, आम्ही चांगली कामगिरी करू पण रिषभ पंतच्या दुखापतीचा दिल्ली कॅपिटल्सवर नक्कीच परिणाम होईल."
आगामी हंगामासाठी दिल्ली कॅपिटल्सचा संघ - अक्षर पटेल, पृथ्वी शॉ, एनरिच नॉर्खिया, डेव्हिड वॉर्नर, ललित यादव, खलील अहमद, लुंगी एनगिडी, चेतन सकारिया, रोव्हमन पॉवेल, एम रहमान, कमलेश नागरकोटी, कुलदीप यादव, सर्फराज खान, प्रविण दुबे, यश धुल, मिचेल मार्श, विकी ओत्स्वाल, रिपल पटेल, अमन खान, फिल सॉल्ट, इशांत शर्मा, मुकेश कुमार, मनिष पांडे, रिली रोसोवू.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"