नवी दिल्ली - टी-२० क्रिकेटमधील भन्नाट वेगाने गेल्या काही वर्षांत संपूर्ण क्रिकेट जगताला वेड लावले आहे. साडे तीन ते चार तास चालणाऱ्या या खेळामध्ये अनेक अदभूत खेळी क्रिकेटप्रेमींना पाहता येतात. मात्र टी-२० क्रिकेटमध्ये द्विशतकी खेळी करणे ही बाब तशी दुर्मीळच आहे. मात्र दिल्लीतील क्रिकेटपटू सुबोध भाटी याने टी-२० सामन्यात द्विशतकी खेळी करण्याची किमया साकारली आहे. दिल्ली इलेव्हनकडून सिम्बा टीमविरोधात खेळताना सुबोध भाटी याने ही जबरदस्त खेळी केली. २०५ धावांची ही झंझावाती खेळी करत क्रिकेटप्रेमींचे लक्ष वेधून घेतले आहे.
क्लब टी-२० लढतीमध्ये खेळताना सुबोध भाटी याने ही तडाखेबाज खेळी केली आहे. त्याच्या खेळीचं महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे त्याने २०५ धावांमधील १०२ धावा ह्या केवळ १७ चेंडूत फटकावल्या. म्हणजेच त्याने १७ षटकार ठोकले. याशिवाय ७९ चेंडूच्या आपल्या खेळी त्याने १७ चौकारही मारले.
सलामीला आलेल्या सुबोधने अखेरपर्यंत नाबाद राहत ७९ चेंडूत १७ चौकार आणि १७ षटकारांच्या मदतीने नाबाद २०५ धावा फटकावल्या. या खेळीच्या जोरावर सुबोधच्या संघाने २० षटकांत २५६ धावा कुटल्या. यापूर्वीही सुबोधने अशा धडाकेबाज खेळी करून आपल्या संघाला विजय मिळवून दिले आहेत.