- हर्षा भोगले लिहितात...
दिल्ली कॅपिटल्स घरच्या मैदानावर सतत पराभवाला सामोरे जात आहे. यामागे संघाने खेळपट्टीचे स्वरूप लक्षात न घेता संघ निवडला का? किंवा संघासाठी अनुकूल ठरेल अशी खेळपट्टी त्यांना उपलब्ध करून देण्यात आली नाही असेच म्हणावे लागेल.
कॅपिटल्स असा दुर्मिळ संघ ठरला, ज्यांना स्थानिक परिस्थिती पूरक ठरत नाही. स्वत:च्या घरी परतणे ज्याला पसंत नसावे, अशीच काहीशी ही स्थिती आहे. संघाचे पाच सामने शिल्लक असून तीन जिंकावेच लागतील. हे तिन्ही सामने घरच्या मैदानावर खेळायचे आहेत. दिल्लीला स्थानिक खेळपट्टीचे स्वरूप पाहूनच विजयी संतुलन साधणारा संघ निवडावा लागेल. याचा सोपा उपाय संघात अधिक फिरकी गोलंदाज खेळविणे हा ठरू शकतो. मुंबई इंडियन्सने जयंत यादवला खेळवून समजूतदारपणा दाखवला होता. पण दिल्लीला आपल्या फलंदाजांकडून धावांची मोठी साथ हवी आहे. २० षटके खेळल्यानंतरही लक्ष्य गाठण्यापासून ४० धावांनी दूर राहण्यासारखी कामगिरी शोभनीय नाही. अशास्थितीत अनुभवी शिखर धवन आणि कर्णधार श्रेयस अय्यर यांना संघाला विजयी पथावर नेण्यासाठी पुढे येऊन मार्ग दाखवावाच लागेल.
सुदैवाने अन्य संघाच्या तुलनेत दिल्ली संघ गुणतालिकेत भक्कम आहे. यामुळे त्यांचा खेळ कसा आहे, याची खात्री पटते. तरीही संघाला खेळाचा दर्जा उंचवावा लागेल. कामगिरीत सुधारणा घडवून न आणल्यास किंग्स इलेव्हन पंजाब संघ परिस्थितीचा पूर्ण लाभ घेऊ शकेल. येथे विजय मिळाल्यास अश्विनच्या पंजाब संघाचे १२ गुण होतील. किंग्स पंजाबबाबत असा कुणी विचार केला नसेल.
पंजाब संघात ख्रिस गेल असेल तर दिल्लीला खेळपट्टी स्वत:साठी अनुकूल अशीच तयार करून घ्यावी लागणार आहे. त्याचवेळी अक्षर पटेल आणि ख्रिस मॉरिस यांच्या डेथ ओव्हरमध्ये दिल्लीच्या फलंदाजांना धावा काढाव्याच लागतील.
मुंबई इंडियन्स आणि दिल्ली यांच्यात झालेल्या लढतीत हार्दिक पांड्याने फरक निर्माण केला. फलंदाजी करतेवेळी हार्दिक मला अनेकदा आश्चर्यचकित करतो. त्याची फलंदाजी फारच सहजसोपी आणि फटकेबाजी विस्तीर्ण असते. दुसरीकडे दिल्लीकडे सहाव्या स्थानावर असा कुणीही फलंदाज दिसत नाही.
पंजाब आणि दिल्ली या दोन्ही संघात सुपरस्टार्सचा फारसा भरणा नसला तरी प्रेक्षकांना मैदानाकडे आणण्यात आणि त्यांचे पुरेपूर मनोरंजन करण्याची क्षमता मात्र दोन्ही संघांमध्ये नक्कीच आहे.
Web Title: Delhi should choose the team to look at the pitches
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.