नवी दिल्ली - अंडर 23 क्रिकेट संघातील खेळाडूंनी हॉटेलमधील महिला कर्मचाऱ्यांशी गैरवर्तणूक केल्याचा आरोप करण्यात आला आहे. अंडर 23 दिल्ली क्रिकेट संघातील कुलदीप यादव आणि लक्षय थरेजा यांना शुक्रवारी डीडीसीएने घरचा रस्ता दाखवला. कोलकाता येथील हॉटेलमध्ये महिला कर्मचाऱ्यांशी गैरवर्तणूक केल्याचा आरोप ठेवत असोसिएशनने दोन्ही खेळाडूंवर ही कारवाई केली आहे.
सीके नायडू ट्रॉफी स्पर्धेतील पश्चिम बंगाल विरुद्धच्या सामन्यासाठी दिल्लीचा संघ कोलकाता येथील एका हॉटेलमध्ये उतरला होता. त्यावेळी, कुलदीप यादव आणि लक्षय थरेजा यांनी तेथील महिला कर्मचाऱ्यांशी उद्धव वागणूक केल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे. फलंदाज थरेजा याने नुकतेच अर्धशतक झळकावून उत्कृष्ट कामगिरी केली होती. तर आगामी रणजी ट्रॉफीसाठी पंजाबविरुद्धच्या सामन्यात इशांत शर्माच्या जागी कुलदीप यादवला स्थान देण्यात आले होते. दरम्यान, अद्याप याप्रकरणी पोलिस तक्रार दाखल करण्यात आली नसून डीडीसीएने संचालक संजय भारद्वाज यांना कोलकाता येथे पाठवले आहे. याप्रकरणी लक्ष देऊन प्रकरण हाताळण्याची जबाबदारी त्यांच्यावर सोपविण्यात आली आहे. कुलदीप आणि लक्षेय यांनी हॉटेलमधील महिला कर्मचाऱ्यांच्या दरवाजाची बेल वाजवल्याचं एका सीसीटीव्ही फुटेजमध्ये आढळून आल्याचं डीडीसीएच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने माध्यमांशी बोलताना सांगितले.