सीएए विरोधातील आंदोलनास दिल्ली येथे सोमवारी हिंसाचाराने तडा गेल्यानंतर मंगळवारी आगडोंब उसळला. या हिंसाचारात आतापर्यंत एका पोलिसासह 34 जणांचा बळी गेला आहे. तसेच 200 हून अधिक जण जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. या प्रकरणानंतर भारताचा हिटमॅन रोहित शर्मानं एक भावनिक पोस्ट केली आहे. त्यानं दिल्लीकरांना एक आवाहनही केलं आहे.
दिल्लीतील आंदोलनाने हिंसक वळण घेतल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. जाफराबाद, मौजपूर, चांद बाग, कारावाल नगर येथे संचारबंदी लागू करण्यात आली असून दंगेखोरांना दिसताक्षणी गोळ्या घालण्याचे आदेश दिल्ली पोलिसांना देण्यात आले आहेत. दिल्लीतील हिंसाचार रोखण्यासाठी करण्यात येणाऱ्या उपाययोजनांबाबत चर्चा करण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी बैठक बोलावली होती. या बैठकीनंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीत हिंसाचार रोखण्यासाठी सर्वपक्षीय मिळून प्रयत्न करू, असे सांगितले होते.
या हिंसाचारानंतर भारताचा माजी फलंदाज वीरेंद्र सेहवाग आणि युवराज सिंग यांनी शांततेचं आवाहन केलं होतं.