नवी दिल्ली : झुंजार खेळाचे प्रदर्शन केलेल्या दिल्लीने आयपीएल प्ले ऑफच्या आशा उंचावताना राजस्थानला २० धावांनी नमवले. प्रथम फलंदाजीचे निमंत्रण मिळाल्यानंतर दिल्लीने २० षटकांत ८ बाद २२१ धावा उभारल्या. यानंतर राजस्थानला २० षटकांत ८ बाद २०१ धावाच करता आल्या. दिल्लीकडून जॅक फ्रेजर-मॅकगर्क आणि अभिषेक पोरेल यांनी वादळी अर्धशतक झळकावले. राजस्थानकडून कर्णधार संजू सॅमसनचे तडाखेबंद अर्धशतक व्यर्थ ठरले.
मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करताना राजस्थानची अडखळती सुरुवात झाली. यशस्वी जैस्वाल, जॉस बटलर अपयशी ठरल्यानंतर सॅमसनने जबरदस्त फटकेबाजी करत संघाला विजयी मार्गावर ठेवले. २८ चेंडूंत अर्धशतक झळकवलेला सॅमसन १६व्या षटकात बाद झाला. येथून सामना दिल्लीच्या बाजूने झुकला. ३२ धावांत ५ बळी घेत दिल्लीने राजस्थानची ३ बाद १६२ धावांवरून ८ बाद १९४ अशी अवस्था करत सामन्याचा निकाल स्पष्ट केला.
खलील अहमद, मुकेश कुमार आणि कुलदीप यादव यांनी प्रत्येकी २ बळी घेतले. त्याआधी, जॅक फ्रेजर-मॅकगर्क आणि अभिषेक पोरेल यांनी दिल्लीसाठी २६ चेंडूंत ६० धावांची स्फोटक सलामी दिली. यामध्ये ५० धावा एकट्या मॅकगर्कनेच फटकावल्या. तो १९ चेंडूंत अर्धशतक झळकावून बाद झाला. यानंतर पोरेलने यंदाच्या सत्रातील आपले पहिले अर्धशतक झळकावले. रविचंद्रन अश्विनने ३ बळी घेतले. त्यानेच मॅकगर्क आणि पोरेल यांना बाद केले. ट्रिस्टन स्टब्सने २०५ च्या स्ट्राइक रेटने फटकेबाजी करत दिल्लीला दोनशेचा पल्ला पार करून दिला. ट्रेंट बोल्ट, संदीप शर्मा आणि युझवेंद्र चहल यांनी प्रत्येकी एक बळी घेतला.
आयपीएलमध्ये सर्वाधिक तीन वेळा २० हून कमी चेंडूंमध्ये अर्धशतक झळकावणारा जॅक फ्रेजर- मॅकगर्क हा पहिला फलंदाज ठरला.
टी-२० क्रिकेटमध्ये ३५० बळींचा टप्पा गाठणारा युझवेंद्र चहल हा पहिला भारतीय, तर एकूण अकरावा गोलंदाज ठरला.
संजू सॅमसनने आयपीएलमध्ये २०० षटकार पूर्ण केले. अशी कामगिरी करणारा तो पाचवा भारतीय, तर एकूण दहावा फलंदाज ठरला.
Web Title: Delhi's play off hopes alive; Rajasthan defeated by 20 runs; Sanju Samson's failed fight
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.