भारतीय संघाचा माजी कर्णधार सौरव गांगुली याची भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या ( बीसीसीआय) अध्यक्षपदी निवड पक्की झाली. गांगुलीविरोधात अध्यक्षपदासाठी कोणीही अर्ज न भरल्यानं ही निवडणुक बिनविरोध झाली. नाट्यमय घडामोडीनंतर गांगुलीला हे अध्यक्षपद मिळाले आहे. गांगुलीच्या रुपानं 65 वर्षांनंतर भारतीय कर्णधार बीसीसीआयच्या अध्यक्षपदी विराजमान होणार आहे. गांगुलीची निवड निश्चित झाल्यानंतर माजी सलामीवीर विरेंद्र सेहवागनं हटके शैलीत दादाचे अभिनंदन केले.
त्याने लिहिले की,''अभिनंदन दादा. देर है अंधेर नही.. भारतीय क्रिकेटमध्ये सकारात्मक पाऊल. भारतीय क्रिकेटसाठी तू बरंच योगदान दिले आहेस आणि त्यात अधिक भर पडेल, याची खात्री आहे.''
अध्यक्षपदावर निवड होताच गांगुली बीसीसीआयच्या मुख्यालयातील दुसऱ्या माळ्यावर गेला आणि तेथील एका फोटोसोबत सेल्फी काढली. या फोटोत गांगुलीसोबत सचिन तेंडुलकर आणि राहुल द्रविड हे जुने सहकारी दिसत आहेत. त्यांच्यासोबत गांगुलीनं मैदानावर अनेक आनंदाचे क्षण साजरे केले आणि अध्यक्षपदाचा आनंदही त्याला त्यांच्यासोबत साजरा करावासा वाटला. पण, सध्यातरी त्यानं हे स्वप्न जुन्या सहकाऱ्यांच्या फोटोसोबत पूर्ण केले.