नेल्सन (न्यूझीलंड) : हेन्री निकोल्स (९५) आणि विल यंग (८९) या दोघांनाही शतकाने हुलकावणी दिली असली तरी त्यांनी दुसऱ्या गड्यासाठी केलेल्या १२८ धावांच्या भागीदारीच्या जोरावर न्यूझीलंडने दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात बांगलादेशला सात गडी राखून नमविले आणि तीन सामन्यांच्या मालिकेत २-० अशी विजयी आघाडी घेतली. बांगलादेशच्या सौम्या सरकारने केलेली १६९ धावांची शानदार खेळी संघाला विजय मिळवून देऊ शकली नाही.
बांगलादेशने सौम्या सरकारच्या खेळीच्या जोरावर ४९.५ षटकांत सर्वबाद २९१ धावा केल्या. न्यूझीलंडने ४६.२ षटकांत तीन बाद २९६ धावा करताना विजय मिळवला. सौम्या सरकार सामनावीर किताबाचा मानकरी ठरला.
मालिकेतील सुरुवातीच्या सामन्यात १०५ धावांची खेळी करणाऱ्या यंगने मंगळवारी रचिन रवींद्र (४५ धावा) याच्या साथीत ७६ धावांची दमदार सलामी दिली. विल यंगने ९४ चेंडूंत आठ चौकार व दोन षटकारांसह ८९ धावा केल्या. निकोलस पहिल्या सामन्यात खाते उघडण्यातही अपयशी ठरला होता. त्याने ९९ चेंडूंत आठ चौकार व एका षटकारासह ९५ धावा केल्या. हे दोन्ही फलंदाज बाद झाल्यानंतर कर्णधार टाॅम लॅथम (नाबाद ३४) आणि टाॅम ब्लंडेल (नाबाद २४) यांनी २२ चेंडू राखून संघाला विजय मिळवून दिला.
त्याआधी, सरकारने १५१ चेंडूंत २२ चौकार व दोन षटकारांसह १६९ धावांची खेळी केली आणि संघाला मोठी धावसंख्या उभारून देण्यात मोलाचा वाटा उचलला. लिटन दास (१७४ धावा) याच्यानंतर तो वनडेमध्ये बांगलादेशकडून वैयक्तिक सर्वोच्च धावसंख्या करणारा दुसरा फलंदाज ठरला. सरकार ४९ व्या षटकात बाद झाला. त्याच्या शिवाय यष्टीरक्षक मुश्किकूर रहीम (४५) यानेच न्यूझीलंडच्या गोलंदाजांना चांगला सामना केला.
न्यूझीलंडकडून जेकब डफी आणि विलियम ओराउरके यांनी प्रत्येकी तीन गडी बाद केले. मालिकेतील तिसरा सामना शनिवारी होणार आहे.
संक्षिप्त धावफलक
बांगलादेश : ४९.५ षटकांत सर्वबाद २९१ धावा (सौम्या सरकार १६९, मुश्किकूर रहीम ४५) गोलंदाजी : जेकब डफी ३-५१, विलियम ओराउरके ३-४७. पराभूत वि. न्यूझीलंड : ४६.२ षटकांत ३ बाद २९६ (हेन्री निकोल्स ९५, विल यंग ८९) गोलंदाजी : हसन महमूद २-५७.
Web Title: Despite Saumya Sarkar's knock of 169 runs, New Zealand is heavy on Bangladesh
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.