मुंबई : भारताने बांगलादेशविरुद्धची मालिका २-१ अशी जिंकली. भारतीय संघाने नागपूरमधील निर्णायक सामन्यात ३० धावांनी विजय मिळवला आणि मालिका जिंकली. या विजयानंतर भारतीय खेळाडूंनी जोरदार सेलिब्रेशन केले खरे, पण या विजयानंतरही भारतीय संघातील काही खेळाडूंची दांडी उडू शकते, असे म्हटले जात आहे.
या मालिकेत वेगवान दीपक चहारने आपली छाप पाडली. नेत्रदीपक गोलंदाजी करत चहरने सर्वांची मने जिंकली. धावांचा पाठलाग करताना दीपक चहरने तिसऱ्या षटकात बांगलादेशला दोन धक्के दिले. त्यानं लिटन दासला पहिले बाद केले. वॉशिंग्टन सुंदरनं सुरेख झेल घेतला. पुढच्याच चेंडूवर त्यानं सौम्या सरकारला माघारी पाठवलं. त्यामुळे आता त्याचे संघातील स्थान जवळपास निश्चित झाले आहे. त्याचबरोबर श्रेयस अय्यर, लोकेश राहुल यांचे संघातील स्थान पक्के झाल्याचे समजते. पण काही खेळाडूंचे स्थान मात्र आता धोक्यात आले असल्याचेही म्हटले जात आहे.
या मालिकेत यष्टीरक्षक रिषभ पंत पुन्हा एकदा अपयशी ठरल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळे यापुढे त्याला संधी मिळेल किंवा नाही, हेदेखील पाहणे उत्सुकतेचे असेल. कारण ट्वेन्टी-२० मालिकेत पंतला चांगली कामगिरी करता आलेली नाही. मुंबईच्या शिवम दुबेलाही आपली छाप पाडता आलेली नाही. त्याचबरोबर खलील अहमद, वॉशिंग्टन सुंदर आणि युजवेंद्र चहल यांनाही संघातून बाहेर काढले जाऊ शकते, असेही म्हटले जात आहे.
रिषभ पंतला पुन्हा संधी मिळणार का, वाचा काय म्हणाले सुनील गावस्करमुंबई : भारताचा यष्टीरक्षक रिषभ पंत हा पुन्हा एकदा बांगलादेशविरुद्धच्या सामन्या अपयशी ठरला. त्यामुळे आता पंतला किती संधी द्यायच्या, असा प्रश्न आता चाहते विचारायला लागले आहेत. पण आता या गोष्टीमध्ये उडी घेतली आहे माजी कर्णधार आणि समालोचक सुनील गावस्कर यांनी.
पंतला बांगलादेशविरुद्धच्या तिसऱ्या ट्वेन्टी-२० सामन्यात आपली छाप पाडता आली नाही. फलंदाजी करताना पंतला ९ चेंडूंत ६ धावा करता आल्या. यष्टीरक्षणामध्येही त्याला फारसी चमक दाखवता आली नाही. पंतने रोहितला एक DRS घेण्यासाठी भाग पाडले. त्यावेळी पंत हा आत्मविश्वासाने रोहितला सांगत होता. पण यावेळीही पंतचा निर्णय चुकल्याचेच पाहायला मिळाले. त्यावेळी रोहितने डोक्यावर हात मारल्याचेही पाहायला मिळाले.
याबाबत सुनील गावस्कर यांनी सांगितले की, " जर एखादा व्यक्ती दहावेळा चांगले काम करतो आणि एकदा त्याच्याकडून जर चूक होते तेव्हा त्याची चर्चा होते. पंतबरोबरही असेच काहीसे सुरु आहे. पंत यष्टीरक्षण करताना ९५ टक्के गोष्टी योग्य करतो, पण एका गोष्टीमध्ये त्याच्याकडून चूक होते आणि त्याचीच जास्त चर्चा होते."