अहमदाबाद : वेस्ट इंडिजविरुद्ध आज बुधवारी भारतीय संघ दुसरा एकदिवसीय सामना जिंकून मालिका खिशात घालण्याच्या निर्धारासह मैदानावर उतरणार आहे. उपकर्णधार लोकेश राहुल कोणत्या स्थानावर फलंदाजी करेल, हेदेखील उत्सुकतेचे ठरणार आहे. युजवेंद्र चहल आणि वॉशिंग्टन सुंदर या फिरकी जोडीने विंडीजला अवघ्या १७६ धावांत गुंडाळले होते. त्यानंतर कर्णधार रोहित शर्माच्या ६० धावांच्या बळावर सहा गडी राखून पहिला सामना सहज जिंकला. रोहितच्या नेतृत्वात ऊर्जावान भारतीय संघ द. आफ्रिकेतील पराभवाची मरगळ झटकून आत्मविश्वासाने खेळताना दिसला. रोहित फॉर्ममध्ये आला ही संघाच्या जमेची बाब म्हणावी लागेल. रोहितसोबत डावाची सुरुवात करणाऱ्या ईशान किशनने ३६ चेंडूत २८ धावा केल्या होत्या. राहुल संघात परतल्यामुळे ईशान रोहितसोबत सलामीला खेळेल की मधल्या फळीत येईल, हे उद्या सामना सुरू झाल्यानंतरच कळेल.
राहुल बहिणीच्या लग्नामुळे पहिला सामना खेळू शकला नव्हता. राहुल डावाची सुरुवात करणार असेल तर ईशानला बाहेर बसावे लागू शकते. मधल्या फळीत तो खेळला तर दीपक हुड्डा बाहेर होईल. विराट, ऋषभ आणि सूर्यकुमार यांच्या क्रमात बदल करण्याचा व्यवस्थापनाचा विचार नाही. कोहली दोन वर्षांपासून ७१व्या शतकाच्या प्रतीक्षेत आहे. दुसरीकडे विंडीज संघ पराभव विसरून मुसंडी मारू शकतो. मागच्या १६ सामन्यांत दहाव्यांदा विंडीज संघ संपूर्ण ५० षटके खेळू शकला नव्हता. किरोन पोलार्डला संघात सुधारणेस वाव आहे. फलंदाजीत खेळपट्टी समजून फटके मारण्याचे आव्हान असेल. निकोलस पूरन आणि स्वत: पोलार्ड यांच्याकडून मोठी खेळी अपेक्षित आहे.
धवन, अय्यर कोरोनामुक्त, लवकरच सरावाला सुरुवात करणार -भारत-वेस्ट इंडिज यांच्यातील दुसऱ्या एकदिवसीय सामन्याच्या पूर्वसंध्येला यजमानांना आनंदाची बातमी मिळाली आहे. भारतीय संघाचा सलामीवीर शिखर धवन आणि मधल्या फळीतील फलंदाज श्रेयस अय्यर यांचा कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे आणि त्यामुळे ते आता अन्य सहकाऱ्यांसोबत सरावाला सुरुवात करू शकणार आहेत. मात्र ऋतुराज गायकवाड अजूनही विलगीकरणात आहे.
भारत : रोहित शर्मा (कर्णधार), लोकेश राहुल (उपकर्णधार), मयंक अग्रवाल, ऋतुराज गायकवाड, शिखर धवन, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, ईशान किशन (यष्टिरक्षक), दीपक हुड्डा, ऋषभ पंत (यष्टिरक्षक), दीपक चाहर, शार्दुल ठाकूर, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, वाॅशिंग्टन सुंदर, रवी बिश्नोई, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा आणि आवेश खान. वेस्ट इंडिज : किरोन पोलार्ड (कर्णधार), फॅबियन ॲलेन, एनक्रुमाह बोनर, डेरेन ब्राव्हो, शामार ब्रुक्स, जेसन होल्डर, शाय होप, अकील हुसेन, अल्झारी जोसेफ, ब्रेंडन किंग, निकोलस पूरन, केमार रोच, रोमारियो शेपर्ड, ओडियन स्मिथ, हेडन वाल्श ज्युनियर.