मुंबई : पहिल्या लढतीतील विजयामुळे आत्मविश्वास उंचावलेला भारतीय महिला संघ सोमवारी दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात वानखेडे स्टेडियमवर विश्वविजेत्या इंग्लंडला नमवून मालिका जिंकण्यास खेळेल.
शुक्रवारी भारतीयांनी वानखेडे स्टेडियमवर इंग्लंडला ६६ धावांनी पराभूत करीत मालिकेत शानदार सुरुवात केली होती. या विजयामुळे फक्त भारतीय संघाचा आत्मविश्वासच दुणावला नाही, तर आयसीसी चॅम्पियनशीपमध्ये दोन महत्त्वपूर्ण गुणही मिळाले जे की, २०२१ वर्ल्डकपसाठी थेट पात्र ठरण्याच्या शर्यतीसाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे. फिरकी गोलंदाज एकता बिष्ट हिने पहिल्या लढतीत सुरेख गोलंदाजी करत २५ धावांत ४ गडी बाद केले होते. त्यामुळे भारतीय गोलंदाजांनी इंग्लंडला डोके वर काढण्याची संधी दिली नाही. अनुभवी झुलन गोस्वामी व शिखा पांडे यांनीही महत्त्वाची भूमिका बजावली.
फलंदाजीत युवा सलामीवीर जेमिमा रॉड्रिग्ज हिलाही चांगला सूर गवसला आहे, तर पहिल्या सामन्यात २४ धावा करणारी स्मृती मानधनाही मोठी खेळी करण्यास उत्सुक असेल. कर्णधार मिताली राज हिनेही ४४ धावांची खेळी केली होती आणि तिने ५० षटकांच्या स्वरूपात आपली उपयुक्तता वेळोवेळी सिद्ध केली आहे. दीप्ती शर्मा, मोना मेशराम आणि युवा हरलीन देयोल यांच्याकडून चांगली साथ मिळण्याची तिची इच्छा असेल.दुसरीकडे इंग्लंडला मालिकेतील आव्हान जिवंत ठेवण्यासाठी मुसंडी मारण्याची अपेक्षा असेल; परंतु त्यांच्यासमोर मोठे आव्हान हे भारतीय फिरकी त्रिकुटांवर वर्चस्व राखण्याचे असेल.प्रतिस्पर्धी संघभारत (महिला) : मिताली राज (कर्णधार), झुलन गोस्वामी, स्मृती मानधना, जेमिमा रॉड्रिग्ज, दीप्ती शर्मा, तानिया भाटिया (यष्टिरक्षक), आर. कल्पना (यष्टिरक्षक), मोना मेक्षाम, एकता बिष्ट, राजेश्वरी गायकवाड, पूनम यादव, शिखा पांडे, मानसी जोशी, पूनम राऊत आणि हरलीन देयोल.इंग्लंड (महिला) : हिथर नाइट (कर्णधार), टॅमी ब्युमोंट, कॅथरीन ब्रंट, केट क्रास, सोफिया डंकले, सोफी एक्सेलस्टोन, जार्जिया एलविस, एलेक्स हार्टले, एमी जोन्स, लॉरा मार्श, नटाली स्किवर, आन्या श्रबसोल, सारा टेलर (यष्टिरक्षक), लॉरेन विनफील्ड आणि दानी वाट.