इंडियन प्रीमिअर लीगच्या ( आयपीएल 2020) पुढील मोसमासाठी सर्वच संघांनी रणनीती तयार केली आहे. त्यानुसार प्रत्येकानं आपापल्या संघातील काही खेळाडूंना रिलीज केले, तर काहींना संघात कायम राखले आहे. 2008पासून एकही जेतेपद न जिंकलेल्या विराट कोहलीच्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाकडून यंदाही अपेक्षा असणार आहेत. विराट, एबी डिव्हिलियर्स आदी मोठी आणि ट्वेंटी-20 स्पेशालिस्ट खेळाडू संघाकडे आहे, परंतु संघाला गरज असते तेव्हा त्यांच्याकडून साजेशी कामगिरी झालेली नाही. हा इतिहास आहे. त्यामुळे कर्णधार विराट चिंतेत आहे. पण, आयपीएल 2020मध्ये त्याची ही चिंता मिटली आहे. त्याच्या संघातील एक खेळाडू सध्या स्थानिक क्रिकेटमध्ये चांगलाच धुमाकूळ घालत आहे आणि तो RCBसाठी सक्षम सलामीचा पर्याय ठरू शकतो.
RCBनं 2020च्या मोसमासाठी एबी डिव्हिलिअर्स, देवदत्त पडीक्कल, गुरुकीरत सिंह, मोइन अली, मुहम्मद सिराज, नवदीप सैनी, पार्थिव पटेल, पवन नेगी, शिवम दुबे, उमेश यादव, विराट कोहली, वॉशिंग्टन सुंदर आणि युजवेंद्र चहल यांना संघात कायम राखण्याचा निर्णय घेतला आहे. संघात अजूनही सलामीसाठी सक्षम पर्याय विराटकडे नाही. त्यामुळे ते कोलकाता नाइट रायडर्सनं रिलीज केलेल्या ख्रिस लीनला घेण्यासाठी प्रयत्नशील असणार आहे. त्यासाठी त्यांनी मार्कस स्टॉयनिस, शिमरॉन हेटमायर, अक्षदीप नाथ, नॅथन कोल्टर नील, कॉलीन डी ग्रॅंडहोम, प्रयास रे बर्मन, टीम साउदी, कुलवंत खेज्रोलिया, हिम्मत सिंग, हेनरीच क्लासेन, मिलिंद कुमार आणि डेल स्टेन यांना रिलीज केलं.
पण, संघानं कायम ठेवलेल्या खेळाडूंमधील एक फलंदाजाची सध्या चर्चा आहे. या 19 वर्षीय खेळाडूनं विजय हजारे चषक आणि सय्यद मुश्ताक अली ट्वेंटी-20 स्पर्धेत त्यानं सर्वाधिक धावांचा पाऊस पाडला आहे. या दोन्ही स्पर्धांमध्ये पदार्पण करताना त्यानं सर्वाधिक धावांचा विक्रम नावावर केला. देवदत्त पडीक्कल असं या खेळाडूचे नाव आहे. कर्नाटक संघाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या देवदत्तनं विजय हजारे चषक स्पर्धेत 11 सामन्यांत 81.1 च्या स्ट्राईट रेटनं 609 धावा केल्या. त्यात दोन शतकांचा समावेश असून नाबाद 103 ही त्याची सर्वोत्तम खेळी ठरली. सय्यद मुश्ताक अली ट्वेंटी-20 स्पर्धेत 11 सामन्यांत 177.7च्या स्ट्राईक रेटनं 517 धावा चोपल्या. त्यात नाबाद 122 ही त्याची सर्वोत्तम खेळी ठरली. यात पाच अर्धशतकांसह एका शतकाचा समावेश आहे.