मुंबई : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. याबाबतची माहिती देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली. महाराष्ट्रामध्ये देवेंद्र सरकार पडल्यावर भारताचा फिरकीपटू युजवेंद्र चहलचा फोटो चांगलाच वायरल होताना दिसत आहे. देवेंद्र-युजवेंद्र यांच्यामध्ये नेमके काय नाते आहे, या गोष्टीचा विचार सोशल मीडियावर होताना दिसत आहे.
काही वेळापूर्वीच राज्यातील राजकीय घडामोडीत मोठी उलथापालथ पाहायला मिळाली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राजीनामा दिला आहे. त्यामुळे अवघ्या ४ दिवसात भाजपा सरकार कोसळलं आहे. देवेंद्र यांचे सरकार कोळल्यावर युजवेंद्रचा फोटो मात्र चांगलाच वायरल झालेला पाहायला मिळाला आहे.
देवेंद्र फडणवीस यांचे सरकार पडल्यावर यु़जवेंद्रचा एक फोटो वायरल झाला आहे. हा फोटो लंडनमध्ये झालेल्या विश्वचषकातील आहे. या विश्वचषकातील एका सामन्यात युजवेंद्र संघाबाहेर होता आणि संघाला ड्रिंक्स देण्याचे काम तो करत होता. पाणक्याची भूमिका बजावता असताना युजवेंद्रचा एक रीलॅक्स फोटो आता वायरल झाला आहे आणि या फोटोमध्ये युजवेंद्रची तुलना राज ठाकरे यांच्याशी केली आहे.
सर्वोच्च न्यायालयाने भाजपाला उद्या विधानसभेत बहुमत सिद्ध करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे भाजपाकडे बहुमत नसल्याची कबुली देत देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्याकडे सुपूर्द करणार असल्याचे सांगितले.
अजित पवारांनी उपमुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिल्याची माहिती देत देवेंद्र फडणवीस म्हणाले, " सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर अजित पवारांनी भेटून सांगितले की काही कारणाने आम्ही आघाडीत राहू शकत नाही, त्यामुळे आमच्याकडे बहुमत उरलेले नाही, आम्ही कुणाचेही आमदार फोडणार नाही."
याचबरोबर, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे नाव न घेता देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्यावर टीका केली. मातोश्रीवरुन बाहेर न पडणाऱ्यांनी अनेकांच्या पायऱ्या झिजवल्या, असे म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला. तसेच, शिवसेनेला नंबर गेम लक्षात आला आणि बार्गेनिंग पॉवर वाढल्याचे समजल्याने जे कधीच ठरले नव्हते, त्याबाबत शिवसेनेने दिली, तरीही भाजपाने सात्विक भूमिका घेतली. परंतु शिवसेना काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत चर्चा करु लागली, असा आरोपही देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेवर केला.