IPL 2024 Massive blow to CSK - चेन्नई सुपर किंग्सला गुरुवारी मोठा धक्का बसला आहे. सहा सामन्यांत ४ विजय मिळवून ८ गुणांसह तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या गतविजेत्या CSK च्या प्रमुख खेळाडूने माघार घेतली आहे. CSK चा सलामीवीर डेव्हॉन कॉनवे ( Devon Conway) याने आयपीएल २०२४ मधून माघार घेतली आहे. आयपीएलच्या मागील दोन पर्वात कॉनवे हा चेन्नईचा प्रमुख खेळाडू ठरला होता आणि त्याने २३ सामन्यांत ९२४ धावा चोपल्या होत्या. त्यात ९ अर्धशतकांचा समावेश होता आणि नाबाद ९२ ही त्याची सर्वोत्तम कामगिरी आहे. त्याच्या अनुपस्थितीमुळे CSK ची आघाडीची फळी किंचितशी विस्कळीत झालेली पाहायला मिळतेय.
पण, कॉनवेची उणीव भरून काढताना CSK ने गोलंदाजीची बाजू अधिक भक्कम केली आहे. कॉनवेच्या जागी त्यांनी रिचर्ड ग्लीसन या इंग्लिश गोलंदाजाला करारबद्ध केले आहे. इंग्लंडकडून ६ ट्वेंटी-२०त ९ विकेट्स घेणाऱ्या ग्लीसनने एकूण ९० ट्वेंटी-२० सामन्यांत १०१ विकेट्स घेतल्या आहेत. CSK ने त्याला ५० लाखांत करारबद्ध केले आहे. बांगलादेशचा गोलंगाद मुस्ताफिजूर रहमान २ मे नंतर मायदेशात परतणार आहे. त्यामुळे ग्लीसनची निवड ही योग्य मानली जात आहे. ३६ वर्षीय गोलंदाजाने ILT20 मध्ये पाच सामन्यांत पाच विकेट्स घेतल्या होत्या.
न्यूझीलंडचा स्टार सलामीवीर क़ॉनवे याने २०२३च्या आयपीएल जेतेपदात सिंहाचा वाटा उचलला होता. त्याने अंगठ्याच्या दुखापतीमुळे आयपीएल २०२४ मधून माघार घेतली आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत त्याला ही दुखापत झाली होती आणि त्यावर आता शस्त्रक्रीया करण्यात येणार आहे. २०२२ मध्ये कॉनवे CSK च्या ताफ्यात दाखल झाला होता आणि त्याने सलामीला येऊन मैदान गाजवले होते. २०२३च्या पर्वात त्याने १६ सामन्यांत ५१ पेक्षा अधिकच्या सरासरीने ६७१ धावा केल्या.