ढाका प्रीमिअर लीगमध्ये बांगलादेशचा अष्टपैलू खेळाडू शाकिब अल हसन याच्या उद्धटपणामुळे बांगलादेचे अम्पायर मोनिरुझ्झमान ( Moniruzzaman ) यांनी अम्पायरिंग सोडण्याचा निर्णय घेतला. ढाका प्रीमिअर लीगमधील एका सामन्यात शाकिबनं अम्पायरच्या निर्णयावर नाराजी व्यक्त करताना त्यांच्या अंगावर धाव घेतली होती. इतकेच नव्हे, तर शिविगाळ करताना शाकिबनं स्टम्प्सचीही फेकाफेक केली होती. मैदानावरील खेळाडूच्या या वागणुकीचा मोनिरुझ्झमान यांनी धसका घेतला अन् यापुढे अम्पायरिंग न करण्याचा निर्णय जाहीर केला. शाकिबला या गैरवर्तनाची शिक्षा म्हणून तीन सामन्यांची बंदी घातली गेली होती.
उधारीच्या रायफलवर करावा लागायचा सराव, सोनू सूदनं पाठवली अडीच लाखांची रायफल!
''आता बस झालं आणि आता मला अम्पायरिंग करायचीच नाही. मला स्वाभिमान आहे आणि मला त्याच्यासोबत जगायचं आहे. अम्पायरकडूनही चुका होतात, परंतु त्यांना अशा प्रकारे वागणुक मिळत असेल, तर हे काम करण्यात काहीच अर्थ नाही. मी फक्त पैशासाठी हे काम करत नाही,''असे मोनिरुझ्झमान यांनी Cricbuzzसोबत बोलताना सांगितले.
''शाकिबनं ज्या सामन्यात गैरवर्तन केलं त्या सामन्यात मी टीव्ही अम्पायर म्हणून काम करत होतो आणि तो प्रकार मी वारंवार पाहिला. तो ज्या प्रकारे वागला ते सहन करणं मला अवघड गेलं असतं. त्यामुळे मी यापुढे अम्पायरिंग न करण्याचा निर्णय घेतला,'' असेही ते म्हणाले.
नेमकं काय घडलं होतं?ढाका प्रीमिअर लीगमध्ये अष्टपैलू खेळाडू शाकिब मोहम्मदीन स्पोर्टिंग क्लबचा कर्णधार आहे आणि अबहानी लिमिटेड विरुद्धच्या सामन्यात त्याचा राग अनावर झाल्याचे पाहायला मिळाला होता. त्याच्या गोलंदाजीवर अम्पायरने पायचीत न दिल्यानंतर त्याने स्टम्पला लाथ मारली आणि पंचांशी हुज्जत घालू लागला. त्याचा हा अवतार पाहून सहकारी खेळाडूही अचंबित झाले.
षटक संपल्यानंतर तो पुन्हा अम्पायरच्या दिशेनं धावला अन् स्टम्पच फेकून दिले. मोहम्मदीन संघाच्या कर्णधारानं 27 चेंडूंत 37 धावा केल्या आणि संघाला प्रथम फलंदाजी करताना 6 बाद 145 धावांपर्यंत मजल मारून दिली. लक्ष्याचा पाठलाग करताना अबहानी संघाचे 3 फलंदाज 31 धावांवर माघारी परतले होते आणि तेव्हा शाकिबनं हे अशोभऩीय कृती केली.