बांगलादेशचा स्टार अष्टपैलू खेळाडू शाकिब अल हसन ( Shakib Al Hasan) यानं शुक्रवारी अशोभनीय कृती केली. ढाका प्रीमिअर लीगमध्ये ( Dhaka Premier League ) शाकिब मोहम्मदीन स्पोर्टिंग क्लबचा कर्णधार आहे आणि अबहानी लिमिटेड विरुद्धच्या सामन्यात त्याचा राग अनावर झाल्याचे पाहायला मिळाले. त्याच्या गोलंदाजीवर अम्पायरने पायचीत न दिल्यानंतर त्याने स्टम्पला लाथ मारली आणि पंचांशी हुज्जत घालू लागला. त्याचा हा अवतार पाहून सहकारी खेळाडूही अचंबित झाले. षटक संपल्यानंतर तो पुन्हा अम्पायरच्या दिशेनं धावला अन् स्टम्पच फेकून दिले. त्याच्या या कृतीचा व्हिडीओ समाजमाध्यमावर व्हायरल झाल्यानंतर सर्वांनी टीका केली. वीरेंद्र सेहवागनंही खास शैलीत त्याचे कान टोचले.
आता शाकिबवर ढाका प्रीमिअर लीगमध्ये तीन सामन्यांची बंदी घातली गेली आहे. एवढेच नाही तर शाकिबनं बांगलादेश क्रिकेट बोर्डाचे डायरेक्टर व प्रतिस्पर्धी संघाचे प्रशिक्षक खालेद महमूद यांच्यासोबतही उद्धट वर्तवणूक केली. दरम्यान सर्व स्तरावरून टीका झाल्यानंतर शाकिबनं समाजमाध्यमावरून माफी मागितली. ''संघ, व्यवस्थापक, स्पर्धा अधिकारी आणि आयोजक या सर्वांची मी माफी मागतो. मला माझ्या रागावर ताबा ठेवायला हवा होता. भविष्यात अशा प्रकारची चूक माझ्याकडून होणार नाही,''असे शाकिबनं लिहिलं.
मोहम्मदीन संघाच्या कर्णधारानं 27 चेंडूंत 37 धावा केल्या आणि संघाला प्रथम फलंदाजी करताना 6 बाद 145 धावांपर्यंत मजल मारून दिली. लक्ष्याचा पाठलाग करताना अबहानी संघाचे 3 फलंदाज 31 धावांवर माघारी परतले होते आणि तेव्हा शाकिबनं हे अशोभऩीय कृती केली.
शाकिब अल हसनवर तीन सामन्यांची बंदी घातली गेली आहे तर 5 लाखांचा दंडही भरावा लागणार आहे.