आशिया चषक स्पर्धेसाठी बीसीसीआयने काल टीम इंडियाच्या १७ सदस्यीय संघाची घोषणा केली. जसप्रीत बुमराह, लोकेश राहुल, श्रेयस अय्यर यांचे वन डे संघात पुनरागमन झाले आहे, तर तिलक वर्माची आश्चर्यकारक निवड केली गेली आहे. वन डेत निराशाजनक कामगिरी करूनही सूर्यकुमार यादवला कायम ठेवले गेले, तर संजू सॅमसनची सरासरी चांगली असूनही त्याला राखीव खेळाडूंमध्ये ठेवले गेलेय. युझवेंद्र चहलला वगळ्याची जोरदार चर्चा आहे. चहलने या निवडीवर काल एक ट्विट करून त्याच्या भावना व्यक्त केल्या होत्या, त्यात आज त्याची पत्नी धनश्री वर्माने ( Dhanashree Varma ) इंस्टास्टोरी पोस्ट केली आहे.
आशिया चषक स्पर्धेसाठी निवडलेल्या संघात रवींद्र जडेजा, अक्षर पटेल व कुलदीप यादव हे तीन फिरकीपटू आहेत. चहलला संघात स्थान न मिळाल्यानंतर धनश्रीने ठेवलेल्या इंस्टा स्टोरीची चर्चा रंगली आहे. तिने या इंस्टा स्टोरीतून प्रगतीसाठी नेमकं काय करायला हवं, असा प्रश्न केला आहे. ''आता मी यावर गंभीरपणे प्रश्न विचारण्यास सुरुवात केली आहे. अति विनम्र आणि अंतर्मुख असणे तुमच्या कामाच्या प्रगतीसाठी हानिकारक असू शकते? किंवा जीवनात प्रगतीसाठी आपण सर्वांनी बहिर्मुख आणि स्ट्रीट स्मार्ट जाणकार असणे आवश्यक आहे का?,''असे तिने लिहिले आहे.
यापूर्वीही चहलला संघातून बाहेर ठेवले गेले आहे. २०२१च्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेसाठीही त्याची निवड झाली नव्हती. मागच्या वर्षी ऑस्ट्रेलियात झालेल्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत त्याची निवड झाली, परंतु एकही मॅच खेळण्याची संधी मिळाली नाही.
मी आशिया चषकाच्या संघात हमखास चहलला घेतलं असतं - इरफान पठाणभारतीय संघाची घोषणा झाल्यानंतर इरफानने सोशल मीडियाच्या माध्यमातून म्हटले, "बुमराह आणि प्रसिद्ध मोठ्या कालावधीनंतर पुनरागमन करत असल्याने निवडकर्त्यांना काळजी वाटते. त्यामुळेच भारतीय संघ एका अतिरिक्त गोलंदाजासह खेळताना दिसेल, जो फलंदाजी देखील करू शकेल. पण, माझ्या संघात चहल नक्कीच असेल."