भारतीय संघानं ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर बॉर्डर-गावस्कर कसोटी मालिका जिंकून इतिहास घडवला. ०-१ अशा पिछाडीवरून टीम इंडियानं चार सामन्यांची कसोटी मालिका २-१ अशी जिंकली. टीम इंडियाच्या या विजयाचा आनंद जगभरात साजरा केला गेला. अनेक आंतरराष्ट्रीय वृत्तपत्रांचे फ्रंट पेज ही टीम इंडियाच्या फोटोंनी व विजयाच्या बातम्यांनी भरले होते. नेते, अभिनेते, आजी-माजी खेळाडूंनीही टीम इंडियाच्या शिलेदारांचे कौतुक केलं. पण, दिग्गज अभिनेता धमेंद्र ( Dharmendra) यांनी केलेल्या ट्विटने सर्वांचे लक्ष वेधले. त्यांनी हे ट्विट भारताचा युवा गोलंदाज मोहम्मद सिराज ( Mohammed Siraj) याच्यासाठी लिहिलं होतं. सिराजच्या समर्पित वृत्तीनं धमेंद्र यांना भावुक केलं.
या दौऱ्यावर कसोटी संघात पदार्पण करून इतिहास घडवणारा सिराज मायदेशात परताच एअरपोर्टवरून थेट दफनभूमीत पोहोचला आणि तेथे त्यानं वडिलांच्या कबरीवर पाणावलेल्या डोळ्यांनी श्रद्धांजली वाहिली. सिराजचे वडील मोहम्मद गौस ( Mohammed Ghouse) यांचे २० नोव्हेंबरला निधन झाले. त्याच्या एक आठवड्याआधी भारतीय संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर पोहोचला होता आणि कोरोना नियमांमुळे सिराजला वडिलांच्या अंतिम संस्कारासाठी मायदेशात परतता आले नाही.