Dhawal Kulkarni Mumbai Indians, IPL 2022: मुंबई इंडियन्सची यंदाच्या हंगामाची सुरूवात निराशाजनक झाली आहे. मुंबई इंडियन्सला (Mumbai Indians) आतापर्यंत झालेल्या सहा सामन्यांत एकही विजय मिळवता आलेला नाही. जर त्यांचा आणखी एक पराभव झाला, तर त्यांचे स्पर्धेतील आव्हान जवळपास संपुष्टात येईल. अशातच कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) याने मुंबईचा जुना सहकारी धवल कुलकर्णी याला संघात समाविष्ट करून घेण्याचा पर्याय संघमालकांना सुचवल्याची चर्चा आहे. यंदाच्या पर्वात डेथ ओव्हर्समध्ये मुंबईला स्पेशालिस्ट गोलंदाजाची उणीव भासत आहे. ही कमकुवत बाजू बळकट करण्याण्याच्या दृष्टीने त्याने धवलचं नाव सुचवल्याचं बोललं जात आहे. तशातच धवल कुलकर्णीने एक ट्वीट केल्याने चाहते अधिकच गोंधळात पडलेत.
मिळालेल्या माहितीनुसार, अनुभवी गोलंदाज धवल कुलकर्णी हा लवकरच मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात दाखल होणार आहे. मेगा ऑक्शनमध्ये धवल कुलकर्णीवर कोणीच बोली लावली नाही. त्यानंतर तो IPL 2022च्या हिंदी समालोचकांच्या टीमचा सदस्य झाला. पण, आता तो पुन्हा संघात येणार असल्याची चर्चा आहे. याचदरम्यान त्याच्या एका ट्वीटने चाहते गोंधळात पडले आहेत. "मी कुठे चाललोय का?" असं ट्वीट त्याने केल्यामुळे या सर्व बातम्या खऱ्या की खोट्या या चाहत्यांना अंदाज लावणं अधिकच कठीण झाल्याचं दिसत आहे.
दरम्यान, मुंबई इंडियन्स सहा पराभवांमुळे गुणतालिकेत तळाला आहे. अनुभवी गोलंदाजाची उणीव MI साठी डोकेदुखी ठरतेय आणि म्हणूनच मुंबई इंडियन्सचा संघ धवल कुलकर्णीला संधी देण्याची शक्यता पूर्णपणे नाकारता येत नाही. कुलकर्णीने आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्ससह राजस्थान रॉयल्स आणि गुजरात लायन्स यांचे प्रतिनिधित्व करताना ९२ सामन्यांत ८६ विकेट्स घेतल्या आहेत. आयपीएल २०२०च्या लिलावात मुंबई इंडियन्सने ७५ लाखांमध्ये त्याला करारबद्ध केले होते. २०२१ मध्येही तो संघाचा भाग होता. पण, या कालावधीत त्याला एकच सामना खेळण्याची संधी मिळाली.